
सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्याने संपवले आत्महत्या करून जीवन
MH 28 News Live, चिखली : अवैध सावकारीच्या पाशात अडकलेल्या शेतकऱ्याने सावकाराच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवले. तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील सुधाकर श्रीराम मिसाळ (वय ५५) असे या कर्जबाजारी शेतकर्यचे नाव आहे.
सदर घटना आज (दि.२५) उघडकीस आली. हा अवैध सावकार शेळगाव आटोळ येथीलच असून, त्याने सुधाकर मिसाळ यांची जमीनही बळजबरीने हडप केल्याची माहिती निदर्शनास येत आहे. या सावकाराविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून, अटकेची कारवाई करावी, यासाठी मिसाळ यांच्या नातेवाईकांनी व शेतकर्यांनी चिखली उपजिल्हा रूग्णालयात ठिय्या मांडला आहे. त्यामुळे रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण असून, चिखली पोलिसांनी कुटुंबीयांना अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिलेला आहे.
सुधाकर मिसाळ या गरीब शेतकर्याने गावातीलच एका अवैध सावकाराकडून कर्ज घेतले होते. परंतु, या कर्जापोटी अव्वाच्यासव्वा व्याज लावून त्यांची आर्थिक फसवणूक व लूट करण्यात आली. व्याजासह रक्कम परत देऊनही आणखी पैसे मागितले जात असल्याने, तसेच शेतीही हडप करण्यात आल्याने सुधाकर मिसाळ हे हतबल झाले होते. त्यातच नापिकी व अतिवृष्टीचा फटका बसल्याने ते नैराश्यात गेले होते. जादा पैशासाठी गावातील अवैध सावकाराचा तगादादेखील चालू होता. त्यामुळे आजरोजी सुधाकर मिसाळ यांनी शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही बाब मिसाळ यांच्या कुटुंबीय व ग्रामस्थांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने त्यांना चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी अवैध सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे सुधाकर मिसाळ यांनी पत्नी व मुलाला सांगितले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने संतप्त झालेले सुधाकर मिसाळ यांचे कुटुंबीय, नातेवाईक व परिसरातील शेतकरी यांनी तातडीने संबंधित अवैध सावकारावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. तसेच, उपजिल्हा रुग्णालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत सावकारावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली. याबाबतची माहिती चिखली पोलिसांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व संबंधित अवैध सावकाराविरोधात अंढेरा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्याची सूचना केली. मृतदेहाचे शवपरीक्षण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची तयारी केली. परंतु, नातेवाईक हे अवैध सावकारावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, या भूमिकेवर ठाम होते. चिखली पोलिसांच्या सूचनेनंतर नातेवाईक अंढेरा पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अवैध सावकाराविरोधात इतरही गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.