पेठ येथील अपघातातील मयतांचे कुटुंबिय आणि जखमींना आर्थिक मदत मिळावी – आ. श्वेताताई महाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील पेठ गावानजीक दि. ९ मे रोजी पैनगंगा नदीच्या पुलावरून लक्झरी बस नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात दोन महिला ठार तर ३२ प्रवासी जखमी झाले. या मयतांचे कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर अपघातातील जखमींच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च राज्य सरकारने मंजूर करून लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दि. १२ मे रोजी केली.
मुख्यमंत्री शिंदे आज तालुक्यातील इसरूळ येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असताना आ. श्वेताताई महाले यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एक निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये श्रीमती महाले यांनी ही मागणी केली आहे. तालुक्यातील अमडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठ गावालगतच्या पुलाजवळ जळगाव जामोद वरून पुणे येथे जाणारी बाबा ट्रॅव्हल्स क्रमांक UP 78 FN 46 62 च्या वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी पैनगंगा नदीचे पात्रात उलटली. यामध्ये ३२ प्रवासी जखमी असून लिलाबाई विष्णू भुट्टे, रा. वडशिंगी, ता. जळगाव जामोद आणि संगीता निवृत्ती ठाकरे, रा. धापटी, ता. खामगाव ह्या २ प्रवासी मयत पावल्या आहेत. त्यातील जवळपास २५ प्रवासी गंभीर जखमी झालेले असुन विवीध ठिकाणी उपचार घेत आहेत अशी माहिती या निवेदनात नमूद केली आहे. जानेवारी २०२३ मध्ये नाशिक जिल्ह्यात असाच अपघात झाला असता मृतकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने ५ लाखाची आर्थिक मदत देण्यात आली होती. परंतू पेठ येथे झालेल्या अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांना किंवा जखमींना कोणतीही मदत जाहीर करण्यात आली नाही ही बाब आ. महाले यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे पेठ येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च तातडीने मंजूर करून राज्य सरकारने त्यांना मदत द्यावी अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी केली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button