
जिल्ह्याच्या सुपुत्राचा सातासमुद्रापार झेंडा.. उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी आफ्रिकेतील ९० किमी कॉम्रेड मॅरेथॉन केली पूर्ण
MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी येथील बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र सध्या कारंजाचे उपजिल्हाधिकारी पदावर असलेले ललितकुमार वऱ्हाडे यांनी १०० वर्षांपेक्षा जुनी आणि जगातील एक मोठी आव्हानात्मक समजली जाणारी दक्षिण अफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा ११ जून रोजी यशस्वीपणे पूर्ण केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी १०.४२ तासांत ८७.७ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केली. त्यांच्या या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.
दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन १९२१ ला सुरु झाली. या स्पर्धेला २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाले आहेत. साऊथ आफ्रिकामधील पिटरमेरीटबर्ग व डर्बन ह्या दोन शहरामध्ये ही मॅरेथॉन संपन्न होते. हे अंतर ९० किलोमीटर मीटर आहे. पिटरमेरीटवर्ग येथून सुरू होऊन डर्बनला स्पर्धा संपली. याला डाऊन रन असे म्हणतात. तर डर्बनपासून सुरू होऊन स्पर्धा पिटरमेरीटबर्गला संपली. त्यास अपरन म्हणतात. या वर्षीचा डाऊन रन होता, त्याचे नियोजित अंतर ८७.७ किमी होते. सकाळी ५.३० ला स्पर्धा सुरु होते आणि सायंकाळी ५.३० ला बरोबर बंद केली जाते. स्पर्धकांना ही स्पर्धा १२ तासाच्या आत स्पर्धा पूर्ण करावी लागते. जे स्पर्धा पूर्ण करतात त्यांना स्पर्धा पूर्ण केल्याचे मेडल प्राप्त होते. सकाळी ५ डिग्री तापमान होते आणि दिवसा ते वाढत वाढत २५ डिग्री पर्यंत गेले होते. जगभरातून २५००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
ललितकुमार वऱ्हाडे २०१५ पासून नियमित रनिंग आणि सायकलिंग करतात. या अगोदर त्यांनी २१ किमी. ४२ किमी. ५० किमीच्या मॅरेथॉन धावलेल्या आहेत. आतापर्यंत किमान ५० पेक्षा जास्त मेरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला आहे. मागील २ वर्षापासून ही स्पर्धा त्यांना खुणावत होती. त्यासाठी अमरावती येथील दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनात मागील सहा महिन्यापासून त्यांनी प्रशिक्षण सुरु केले होते. पाटील यांनी जगभरातील शेकडो मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत आणि ही त्यांची ८ वी कॉम्रेड मॅरेथॉन होती. त्यांनी ती १०.४१ तासात पूर्ण केली.