आता प्रत्येक तालुक्यांत होणार सेंद्रिय शेतीचे क्लस्टर; बुलडाणा व चिखली तालुक्यात कृषी विभाग स्थापन करणार गट; प्रति हेक्टर ३२ हजर १३० रुपयांप्रमाणे मिळणार अनुदान
MH 28 News Live बुलढाणा : : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) च्या माध्यमातून परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेती योजना राबविली जात आहे. आता ही योजना डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत जिल्ह्यात व्यापक पद्धतीने राबविली जाणार असून त्यानुसार ‘सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती’साठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सेंद्रिय शेतीचे क्लस्टर तयार केले जाणार आहे.
सेंद्रीय शेतीसाठी परंपरागत कृषी विकास योजना, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या तीन योजनांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे आदी उद्दिष्टे योजनेत ठेवण्यात आली आहेत.
परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजनेंतर्गत प्रति गट २० हेक्टर याप्रमाणे एकूण २५ गटांचे लक्षांक जिल्ह्यास देण्यात आला आहे. त्यासाठी बुलडाणा आणि चिखली या दोन तालुक्यांमध्ये हे गट स्थापन करण्यात येत आहेत. यात प्रति शेतकरी १ हेक्टर मर्यादेपर्यंत लाभ देय असणार आहे. या सेंद्रिय शेतकरी गटाची आत्माअंतर्गत नोंदणी करावयाची आहे. प्रती गट लाभ देण्याचे क्षेत्र जास्तीत जास्त २० हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. परंतु सेंद्रिय शेतीमध्ये शेत जमिनीचे प्रमाणीकरण असल्याने सर्व सदस्यांचे आठ ‘अ’ मधील संपूर्ण क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली आणणे अभिप्रेत आहे. प्रति हेक्टर ३२ हजर १३० रुपयांप्रमाणे बाबानिहाय अनुदान पुढील ३ वर्षांसाठी उपलब्ध राहील.
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या १०० टक्के राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या ३ वर्षांसाठी जिल्ह्याकरीता प्रति वर्ष १५० सेंद्रिय शेतकरी गट आणि १५ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे लक्षांक प्राप्त आहे. १३ तालुक्यांमध्ये १० सेंद्रिय शेतकरी गट आणि कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा आणि जळगाव जामोद यांना प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण १५० गट स्थापन केले जाणार आहे. पुढील ३ वर्षामध्ये एकूण ४५० सेंद्रिय गट स्थापन केले जाणार आहे. एक सेंद्रिय शेतकरी गट हा ५० हेक्टरचा राहणार आहे. प्रति शेतकरी जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्र लाभासाठी ग्राह्य राहणार आहे. तालुक्यात एका गावात शक्यतो सलग क्षेत्रात हा सेंद्रिय गट स्थापन करावयाचा आहे. सेंद्रिय शेतकरी गटाची आत्माअंतर्गत नोंदणी करावयाची आहे.
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये ५० हेक्टर क्षेत्राचा १ नैसर्गिक समूह याप्रमाणे एकूण ७५ समूह स्थापन करण्यात येणार आहे. एका गावात किंवा जवळपासच्या २-३ गावात ५० हेक्टर क्षेत्राचा एक नैसर्गिक शेतीचा समूह असणार आहे. प्रत्येक समूहामध्ये किमान ५० किंवा त्याहून अधिक शेतकरी असावे लागणार आहे. समूहातील शेतकऱ्याला कमाल १ हेक्टर क्षेत्राचा लाभ मिळू शकतो. तथापि त्याचे उर्वरित क्षेत्र कोणतेही अतिरिक्त साहाय्य न देता संपूर्ण क्षेत्र घेण्याची मुभा राहणार आहे. निवड केलेल्या समूहास प्रथम वर्षात शेतीशाळेद्वारे नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती, प्रात्यक्षिकाद्वारे अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यानंतरच्या ३ वर्षात प्रशिक्षण, क्षेत्रीय भेटी, स्वत:चे शेतीवर निविष्टा निर्मितीसाठी डीबीटीद्वारे अर्थसहाय्य आणि प्रमाणीकरण याबाबी राबविण्यात येणार आहेत.
प्रत्येक समूहासाठी पूर्वीपासूच नैसर्गिक शेती करीत असेलल्या आणि त्याबाबत ज्ञान आणि संवाद कौशल्य असलेल्या व्यक्तीची चॅम्पियन शेतकरी म्हणून तर एका स्थानिक युवक शेतकऱ्याची संसाधन व्यक्ती म्हणून ग्रामपंचायतीच्या सल्ल्याने मानधन तत्वावर निवड करण्यात येणार आहे. प्रति गट प्रति हेक्टर २७ हजार २५० रुपयांप्रमाणे बाबानिहाय अनुदान पुढील तीन वर्षासाठी राहील. या तीनही योजनांमध्ये शेतकरी प्रशिक्षण, सेंद्रिय शेतीमध्ये रुपांतरणासाठी अर्थसहाय्य, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेस सहाय्य आणि पूरक भागभांडवल देणे, कंपनी स्तरावर जैविक निविष्टा निर्मिती केंद्र स्थापन करणे, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण आदी बाबीसाठी मापदंडानुसार अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या योजनांमध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button