
शेगावमध्ये हाहाकार… गतिमंद विद्यालयात १४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू
MH 28 News Live / शेगाव : येथील गजानन महाराज गतिमंद विद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांना १३ जानेवारीला अन्नातून विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. यापैकी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून उर्वरित १३ विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
सदर विद्यालयामध्ये १३ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा पार पडली. स्पर्धा आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले, ज्यामधून या गतिमंद विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समजते. विद्यालयातील एकूण १४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, त्यापैकी ज्ञानेश दीपक आखरे (११) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अभिषेक दिगंबर परिहार (१४) आणि राजदीप रत्नदीप हिवाळे (१५) हे दोन विद्यार्थी अत्यवस्थ असल्याने त्यांना अकोला येथे हलवण्यात आले आहे. वेदांत नितीन महाजन (१६), जयेश दिलीप पाटील (१८), यश निलेश जाधव (११), प्रथमेश विलास मानकर (१०), गुंजन विजयसिंह बोराडे, विलास नामदेव वाढे (११), दत्ता दिनकर काटे (१२), देवेंद्र युवराज भारंबे (११), दीपक प्रल्हाद कोल्हे (१२), कुणाल विलास साळी (१०), या नऊ विद्यार्थ्यांवर शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक लक्षणावरून हा प्रकार अन्नातून विषबाधा झाल्यामुळेच घडल्याचे जाणवते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र, खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येईल.
सोमवारी रात्री जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटात त्रास होणे, हगवणचा त्रास होण्यास सुरुवात झाली. ज्ञानेश आखरे याला शौचामधून रक्त जाण्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे व्यवस्थापनाने त्याला शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे प्रथमोपचार करण्यात आल्यावर ज्ञानेश आखरेला सुट्टी देण्यात आली. दरम्यान, आज पुन्हा त्रास होत असल्याने ज्ञानेश आखरेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्ञानेश आखरे अकोला जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button