
दरोडेखोरांचा धुमाकूळ; वारी हनुमान मंदिरात पुजाऱ्याला बंधून ठेवत लांबवीले दागिने
MH 28 News Live / संग्रामपूर : सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या समर्थ रामदास स्वामी स्थापित वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या वारी हनुमान मंदिरात हा धाडसी दरोडा टाकण्यात आला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी हे पुरातन जागृत असे हनुमानाचे मंदिर असून याठिकाणी अनेक राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. जागृत मंदिर असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने मंदिरातील दानपेटीत दान टाकत असतात. तर काहीजण हनुमानावर आभूषण चढवत असतात.
दरोडेखोरांनी लांबविले हनुमानाचे दागिने
दरम्यान सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरात सायंकाळनंतर भाविकांची फारशी वर्दळ नसते. या ठिकाणी पुजारी असतो. दरम्यान रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी मंदिरात येत चोरी केली आहे. यावेळी त्यांनी मंदिरातील पुजाऱ्याला बांधून दरोडेखोरांनी हनुमान मूर्तीवरील आभूषणे लुटली. यात जवळपास साडे पाच किलो चांदीचे दागिने व दान पेटीतील एक लाख रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले.
बांधून ठेवलेल्या पुजाऱ्याने कशीतरी आपली सुटका केली. यानंतर घडल्या प्रकाराबाबत परिसरात माहिती दिली. तसेच पोलिसांना देखील याची माहिती दिल्यानंतर सोनाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेचा पंचनामा करून मंदिरात दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.