
लाडकी बहिण योजनेत जिल्ह्यात सुमारे साडेसहा लाख लाभार्थी; एवढ्या महिलांनी केले लाभ बंद करण्यासाठी अर्ज
MH 28 News Live : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा या महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची वाट जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख बहिणी पाहात आहेत. २६ किंवा ३१ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार, अशी चर्चा सुरू असताना काही अतिउत्साही बहिणी आता २१०० रुपये मिळणार, असा दावा करताना आढळतात. अशातच काही लाडक्या बहिणींनी कारवाईच्या भीतीपोटी या योजनेचा लाभ घेण्यास नकार देणे सुरू केले आहे. तसे रितसर अर्ज महिला व बाल विकास कार्यालयाच्या जिल्हा आणि १३ तालुका कार्यलयांत सादर करण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये लोणार तालुक्यातील भगिनी आघाडीवर असल्याचे चित्र आहे. लोणारमधील २२ बहिणींनी नकार अर्ज सादर केले असून आम्हाला योजनेचा लाभ नको, असे स्पष्ट केले. याचे लोन जिल्ह्यात इतरत्र हळूहळू पसरत आहे. बुलढाणा, मेहकर आणि देऊळगावराजा तालुक्यांतील प्रत्येकी दोन भगिनींना आता मुख्यमंत्र्यांची सप्रेम भेट नको, असे लेखी अर्ज दिले आहे. चिखली, शेगाव आणि मोताळा तालुक्यातील प्रत्येकी एका बहिणीने असेच नकार अर्ज महिला बाल विकास कार्यालयात सादर केले आहे. या नकाराचा वेग लवकरच वाढेल, अशी दाट शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात अली. त्याची युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्यात आली. राज्याच्या तिजोरीची बिकट स्थिती असतानाही योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली होती. कोट्यवधी लाडक्या बहिणींना नियमित अंतराणे १५०० रुपयांचे हप्ते मिळाले. आमची सत्ता आल्यावर २१०० रुपयांची ओवाळणी देऊ, असे वचन महायुतीने निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. राज्यात महायुतीचे सरकार सलग दुसऱ्यांदा स्थापन झाले. लाडक्या बहिणींना कोट्यवधींचे मानधन देण्यासाठी आर्थिक तरतूद करणारे अजितदादा हेच अर्थमंत्री झालेत. महिला व बालविकास खात्याच्या मंत्रीही अदिती तटकरे याच आहेत. फक्त लाडके भाऊ बदलले. आता एकनाथ शिंदे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस हे लाडके भाऊ झाले आहे.
लाभ बंद परंतु कारवाई नाही
आता योजनेचा लाभ नाकारणाऱ्या बहिणींविरुद्ध कोणतीही (कायदेशीर अथवा रक्कम वसुलीची) कारवाई करण्यात येणार नसल्याचे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रमोद एंडोले यांनी स्पष्ट केले आहे. अर्ज करणाऱ्या महिलांचा लाभ बंद होणार. ज्या महिलांविरुद्ध तक्रारी आल्या, त्या अर्जांची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी जिल्हा व तालुका स्तरावरील महिला बाल विकास कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button