
अपत्यांची खोटी माहिती देणे पडले महागात; शिक्षक दांपत्यावर गुन्हा दाखल आणि झाले निलंबन
MH 28 News Live : कुटुंबातील मुलांची माहिती लपवत बनावट छोटे कुटुंब प्रतिज्ञापत्र सादर केले. त्या आधारावर या शिक्षक पदाची सरकारी नोकरी करत पगार घेणे शिक्षक असलेल्या दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. पत्यांची माहिती लपवण्याची माहिती समोर आल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यात आली. यानंतर गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार शिक्षक दाम्पत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती अंतर्गत विश्वी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गजानन सातपुते आणि पांगरखेड येथील शाळेवर कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी छाया सातपुते या दोघांना मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी निलंबित केले आहे. या दोन्ही पती – पत्नी शिक्षक दांपत्याने आपल्या कुटुंबातील मुलांची माहिती लपवत बनावट छोटे कुटुंब प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्या आधारावर या दांम्पत्याने शिक्षक पदाची सरकारी नोकरी करत पगार घेतला.
शिक्षक पती- पत्नीस चार अपत्य
२००५ च्या शासन अधिसूचनेप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंब लहान असणे गरजेचे आहे. मात्र शिक्षणाधिकारी यांच्या चौकशीअंती शिक्षक गजानन नामदेव सातपुते यांना ४ अपत्य असून त्यातील २ अपत्य हे २८ मार्च २००५ नंतरचे आहेत. तर शिक्षक पत्नी छाया गजानन सातपुते यांचे दोन विवाह झाले असून त्यांना ३ अपत्य आहेत. त्यातील एक अपत्य २८ मार्च २००५ नंतरचे असल्याचे समोर आले आहे.
दोघांवर गुन्हे दाखल व निलंबन
सातपुते शिक्षक दाम्पत्यांना दोन पेक्षा जास्त मुले आहेत. शिवाय त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत. त्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने गटविकास अधिकारी यांनी गजानन व छाया सातपुते या शिक्षक दाम्पत्याला निलंबित कारण्याचे आदेश काढले आहे.