
त्या दोघांची जीवन नौका पोहताना बुडाली…तरण तलावात बुडून दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
MH 28 News Live : चिखली : स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या आवारात असलेल्या रेनबो तरण तलावात दि. १० एप्रिल रोजी मोठी दुर्घटना घडली. येथे पोहण्याकरता आलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी ६. ३० वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही विद्यार्थी जिल्ह्याबाहेरील असून त्यांच्या कुटुंबियांना ही माहिती कळवण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बस स्थानकाला लागूनच असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या आवारात रेनबो स्विमिंग पूल या नावाने जलतरण तलाव असून तेथे विविध वयोगटातील मुले – मुली पोहण्यासाठी व जलतरण शिकण्यासाठी नियमितपणे येत असतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात या स्विमिंग पूलवर येणाऱ्याची गर्दी वाढलेली असते. आज देखील बरेच जण येथे पोहण्याकरता आले होते. यामध्ये सु. रा. चुनावले आयुर्वेद महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिक्षण घेणारे दोघे विद्यार्थी देखील पोहण्यासाठी आले होते. सायंकाळच्या सुमारास इतर लोकांसोबत पोहत असतानाच सुरज सुनील पानखडे ( रा. गेवराई, जिल्हा – बीड )विव वेक अरुण वायले ( रा. तेलारा, जिल्हा – अकोला ) या दोघाही २२ वर्षीय तरुणांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. यापैकी एक जण तलावातच ठार झाला तर दुसऱ्याला हाकेच्या अंतरावर असलेल्या भराड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करतानाच मृत्यूने गाठले. महाविद्यालय प्रशासनाने त्वरित इस्पितळात धाव घेऊन या दुर्घटनेची माहिती दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कळवली आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून वृत्त लिहीपर्यंत चिखली पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात मार्ग दाखल करण्यात आला नव्हता. दोघाही मयत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी चिखलीकडे निघाल्याची माहिती कळते.