
कारने धडक देत बाईकला २० फूट फरफटत नेलं; मलकापूर पांगरा येथील शिक्षकाचा मृत्यू…साखरखेर्डा – लव्हाळा रस्त्यावर झाला अपघात
MH 28 News Live : बुलढाणा : लग्नाचं शुभकार्य उरकून घरी जाताना एका तरूण शिक्षकाचा कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील साखरखेडा ते लव्हाळा रस्त्यावर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मोटरसायकल आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने एका युवक शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृतकाचं नाव वैभव दामोदर टाले (वय २७, रा. मलकापूर पांगरा) असं आहे. गोरेगाव येथील शेळके कुटुंबातील लग्न सोहळा साखरखेडा येथील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. मावशीच्या मुलीचं लग्न असल्यामुळे मलकापूर पांगरा येथील टाले कुटुंबातील सर्व सदस्य लग्नाकरिता हजर होते. यासाठी मलकापूर पांगरा येथील वैभव दामोदर हेही कुटुंबासह हजर होते . लग्न लागल्यानंतर वैभव हे सारशीव गावाकडे निघाले. साखरखेडा ते लव्हाळा रस्त्यावर मोहखेड शिवारातील पंजाबराव ताठे यांच्या शेताजवळ हा भीषण अपघात झाला.
लव्हाळा येथून साखरखेडा येथे MH 38 AD 3803 या भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या बाईकला जबर धडक दिली. तब्बल २० फूट मोटरसायकल फरफटत नेली. तर वैभव यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव झाला. याचवेळी अशोक इंगळे आणि सरपंच नितीन ठोसरे हे चिखली येथून एक लग्न सोहळा करून साखरखेडा येथे येत होते. त्यांनी वैभव यांना रस्त्याच्या कडेला पडलेलं पाहिलं. त्यांनी तात्काळ याची माहिती साखरखेडा पोलीस स्टेशनला दिली. यावेळी वरोडी येथील सुमेध गवई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी घटनास्थळी मदतसाठी धावून आले. हा अपघात एवढा भीषण होता की वैभव टाले यांचा जागीच मृत्यू झाला होता.
वैभव हे देऊळगाव राजा पंचायत समितीमधील जांभोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. वडिलांचे छत्र लहानपणी हरवल्याने तीन भावांना आईनं मोठं केलं होतं. तिघेही शासकीय सेवेत कार्यरत आहेत. वडील हे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक होते. त्यांचा आकस्मित मृत्यू झाल्यानं अनुकंप तत्त्वावर वैभव हे शिक्षक म्हणून लागले होते. परंतु त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.