♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आत्महत्या – शासकीय रुग्णालयात मृत्यूचा सापळा ? भरदिवसा रुग्णाने गळफास लावून संपवले जीवन, प्रशासन गाफील !

MH 28 News Live : बुलढाणा : मृत्यूने थेट शासकीय रुग्णालयातच हजेरी लावली! जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने भरदिवसा गळफास लावून आत्महत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. २३ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास घडलेली ही घटना केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या बेफिकिरीचा पर्दाफाश करत नाही, तर हजारो रुग्णांच्या सुरक्षिततेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते.

सागवान (ता. बुलढाणा) येथील विजय गोविंद इंगळे (वय ३८) हे व्यसनाधीनतेमुळे त्रस्त होते. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना १९ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पहिल्या मजल्यावरील वार्डात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रशासनाच्या डोळ्यादेखत त्यांनी केबलच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आणि रुग्णालय व्यवस्थेची झोपच उडवली.

या घटनेमुळे संपूर्ण वॉर्डात एकच गोंधळ उडाला. महिलांची किंकाळी, कर्मचाऱ्यांची धावपळ, डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावाधाव यामुळे संपूर्ण रुग्णालय हादरून गेले. इतक्या मोठ्या इमारती आणि विभागांमध्ये विभागलेल्या रुग्णालयात रुग्ण कुठे गळफास लावत आहे, हे कोणाच्या लक्षातच कसे येत नाही ? हा मुख्य सवाल सर्वसामान्य जनतेला अस्वस्थ करत आहे.

या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. इंगळे यांचं मृतदेह वॉर्डात लटकत असल्याची दृश्यं उपस्थितांची झोप उडवणारी होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय यांचा हलगर्जीपणा स्पष्टपणे समोर येत आहे. घटनास्थळी कोण काय करत होते ? कोणी काहीच का पाहिलं नाही ? कर्तव्याचा विसर पडलेल्या प्रशासनावर कारवाई होणार का ? हे प्रश्न आता उग्र स्वरूप घेत आहेत.
सर्वांचे लक्ष आता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्याकडे लागले आहे. ते यावर कठोर पावलं उचलतात का ?

जिथे जीव वाचायला हवा, तिथेच मृत्यूने शिरकाव केला’ – ही घटना केवळ दुर्दैवी नाही, तर रुग्णालय व्यवस्थेच्या ढासळलेल्या संरचनेचा भेदक पुरावा आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129