
महिला लाभार्थ्याकडून शिलाई मशीन मंजूर करण्यासाठी २५०० ची लाच घेणाऱ्या कनिष्ठ सहाय्यकाला पकडले रंगेहात… चिखली पंचायत समितीमधील भ्रष्टाचार नाट्य उघड
MH 28 News Live / चिखली : समाज कल्याण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या योजनेतून शिलाई मशीन मंजूर करण्याच्या मोबदल्यात महिला लाभार्थ्याकडून २५०० रुपयांची लाच स्वीकारताना चिखली पंचायत समितीमधील कनिष्ठ सहाय्यक हेमंत राजपूत याला लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दि. २६ मे रोजी सायंकाळी ५. १० वाजता लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. त्यामुळे पंचायत समितीमधील भ्रष्टाचार नाट्य समोर आले आहे असेच म्हणावे लागेल.
या संदर्भात थोडक्यात माहिती अशी की, चिखली पंचायत समितीमध्ये समाज कल्याण विभागातर्फे पात्र महिला लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वितरण करण्याची योजना राबवली जात आहे. यासाठी तालुक्यातील येवता येथील रहिवासी असलेल्या मीरा साहेबराव बोके या लाभार्थ्याने अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करून सदर महिला लाभार्थ्याला शिलाई मशीन देण्याच्या मोबदल्यात २५०० रुपयांची लाच पंचायत समिती मधील कनिष्ठ सहाय्यक पदावर काम करणाऱ्या हेमंत राजपूत याने मागितली. ही लाचेची रक्कम पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात स्वीकारताना सायंकाळी ५.१० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात राजपूत हा रंगेहात अडकला. सदर प्रकरणी पुढील कारवाई सुरू असून अद्याप गुन्ह्याची नोंद होणे बाकी आहे.