
नायगावात आता एकही टीबीचा रुग्ण नाही; ग्रामपंचायतला मिळाला टीबीमुक्त ग्राम पंचायत पुरस्कार
MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील नायगाव खुर्द ग्रामपंचायतीला ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र, अमरापुर अंतर्गत देण्यात आला असून, ग्रामपंचायतीने क्षयरोग निर्मूलनासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा सन्मान मिळाला आहे.
या पुरस्कार वितरण समारंभात वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय खरात, डॉ. सायली लोखंडे, समुदाय आरोग्य अधिकारी राजू खेडेकर, आरोग्य सहायक डॉ. रमेश शेळके, आरोग्य सेवक डॉ. शिवाजी साजरे, डॉ. प्रतिभा बुरकुले आणि आरोग्य सेविका डॉ. ज्योती सोळंके यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. गंगाताई नंदकिशोर गुंजकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी आशा सेविका अनिता नाटेकर, अंगणवाडी सेविका आशालता गायकवाड, उपसरपंच सौ. शारदा सतीश अंभोरे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर आरोग्य जनजागृती, तपासणी शिबिरे, व योग्य उपचारांद्वारे क्षयरोग निर्मूलनासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे.