
खामगावमध्ये बालविवाह प्रकरणी आरोपी अटकेत; विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
MH 28 News Live / खामगाव : बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्याला आळा घालण्याच्या दिशेने खामगाव ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. नीलेश सुभाष सरदार (वय २७, रा. नागापूर, ता. खामगाव) या तरुणाला २७ मे रोजी दुपारी अटक करण्यात आली.
या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम ६४ (१), ६४ (२)(एम), तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४ व ६ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कलम ९ व ११ अशा विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई बालविवाहासारख्या सामाजिक समस्येवर पोलिस प्रशासनाचे लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्ट करते. बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी अशी कठोर पावले उचलली जाणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.