
गांजाचा साठा उघड; पोलिसांकडून २.२० लाखांचा माल जप्त; उदयनगर मधील कारवाई
MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील अमडापूर पोलिसांनी दि. २८ मे रोजी मोठी कारवाई करत उदयनगर येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील एका घरावर छापा टाकून ११ किलो २० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या अमली पदार्थाची अंदाजित बाजारमूल्य दोन लाख वीस हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमडापूर पोलिस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी महेश राजेंद्र महानकार (रा. वॉर्ड क्र. ४, इंदिरा नगर, उदयनगर) याच्याकडे गांजा असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून घरावर धाड टाकली. तपासादरम्यान ११ किलोहून अधिक वजनाचा गांजाचा साठा मिळून आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अमडापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अमली पदार्थांवरील पोलिसांचा वाढता दबाव स्पष्टपणे दिसून येत आहे.