
पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी; जनतेचा प्रशासनावर अविश्वास
MH 28 News Live / जळगाव जामोद अमोल भगत) : भाजपचे कार्यकर्ते पंकज उत्तमराव देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. न्याय जनआंदोलन समिती जळगाव जामोद/संग्रामपूर तालुका यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
३ मे २०२५ रोजी पंकज देशमुख यांचा मृतदेह वायाळ शिवारातील त्यांच्या शेतात लहान झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी ही घटना आत्महत्या असल्याचे घोषित केले असले तरी कुटुंबीय व नातेवाईकांनी ती हत्या असल्याचा ठाम आरोप केला आहे. मृतदेहावर असंख्य जखमा, भाजल्याचे व रक्तस्त्रावाचे निशाणे, तसेच पाय जमिनीला टेकलेले दिसणे, हे सर्व घटक आत्महत्येच्या दाव्याला छेद देणारे आहेत, असा कुटुंबीयांचा आरोप आहे.
शवविच्छेदनासाठी मृतदेह अकोल्यात हलवताना कुटुंबीयांना माहिती न देणे, पंचनामा करताना त्यांची उपस्थिती न ठेवणे, आणि दोन तासांचा प्रवास पाच तासांनी पूर्ण करणे यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनावर कुटुंबीयांचा व जनतेचा विश्वास उरलेला नाही, अशी भावना आहे.
या पार्श्वभूमीवर, देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, सात दिवसांत मागणी मान्य न झाल्यास जनतेसह मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जनआंदोलन समितीने दिला आहे. या निवेदनादरम्यान विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.