
“संघगंगा के तीन भगीरथ” – रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चिखलीत राष्ट्रीय विचारांचा प्रेरणादायी नाट्यप्रयोग मंगळवारी होणार !
MH 28 News Live / चिखली : भारताला शक्तीसम्पन्न व समृद्ध हिंदूराष्ट्र बनवण्याच्या पवित्र ध्येयाने शंभर वर्षांपूर्वी नागपूरमधून सुरू झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवाह आजही अखंड वाहतो आहे. या संघ कार्याची बीजे रोवणाऱ्या तीन महान विभूती डॉ. केशव बळीराम हेडगेवार, माधव सदाशिव गोलवलकर उपाख्य श्री गुरुजी, व मधुकर दत्तात्रय उपाख्य बाळासाहेब देवरस यांच्या जीवनकार्यावर आधारित “संघगंगा के तीन भगीरथ” हे प्रेरणादायी हिंदी नाटक चिखलीकर प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे.
जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठान, चिखली यांच्या वतीने मंगळवार, दि. २४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता मौनीबाबा संस्थान सभागृहात हे नाट्य सादर होणार आहे. संघाच्या पहिल्या तीन सरसंघचालकांच्या असामान्य कार्याची, राष्ट्रभक्तीची आणि नेतृत्वाची यशोगाथा या नाट्यातून प्रभावीपणे उलगडली जाणार आहे.
या नाट्यप्रस्तुतीची सुरुवात भारतमातेच्या वंदनाने होते. त्यानंतर पहिल्या अंकात डॉ. हेडगेवार यांचे बालपण, क्रांतिकारी कार्य, ‘वंदेमातरम्’चा प्रेरक प्रसंग, संघ स्थापनेचा संकल्प, काँग्रेसमधील योगदान व महात्मा गांधीजींशी झालेली ऐतिहासिक भेट याचे नाट्यमय सादरीकरण करण्यात येणार आहे.
दुसऱ्या अंकात पू. श्री गुरुजींच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे; सारगाछी येथील शिक्षण, अखंडानंदस्वामींसोबतचा संवाद, संघ कार्यात सक्रिय सहभाग, आणि संघ प्रमुख म्हणून त्यांच्या नियुक्तीचा कालखंड सादर होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेलांसोबतचा संवाद, काश्मीर भारतात विलीनीकरणातील भूमिका, संघावरील बंदी तसेच बाळासाहेब देवरस यांच्या नेतृत्वात झालेला आणीबाणीतील सत्याग्रह व रामजन्मभूमी आंदोलन अशा निर्णायक प्रसंगांचा समावेश करण्यात आला आहे.
या नाटकाद्वारे १८८९ ते १९९६ पर्यंतचा १०७ वर्षांचा प्रेरणादायी इतिहास आणि तीन आदर्श नेतृत्वकर्त्यांच्या कार्याची ओळख प्रेक्षकांना होणार आहे. या कार्यकर्तृत्वाचा प्रवाह गंगेप्रमाणे अखंड वाहत असल्याने या नाट्यकृतीला “संघगंगा” हे समर्पक नाव देण्यात आले आहे, तर डॉ. हेडगेवार, श्री गुरुजी आणि बाळासाहेब देवरस हे या संघगंगेचे तीन भगीरथ आहेत.
राधिका क्रिएशन्स, नागपूर यांच्या निर्मितीतील या नाट्यकृतीचा चिखलीत प्रथमच सादर होत असलेला प्रयोग रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. या ऐतिहासिक, राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या नाट्याविष्काराचा लाभ घेण्याचे आवाहन जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठान, चिखलीच्या वतीने करण्यात आले आहे.