
मराठा युवकांच्या स्वावलंबनाच्या स्वप्नांना ब्रेक ; अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज रखडले, चिखली तालुक्यातील अर्जदारांमध्ये तीव्र नाराजी
MH 28 News Live / चिखली :तालुक्यातील अनेक युवक स्वावलंबी होऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या आशेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून बँकांकडे कर्ज प्रस्ताव सादर करीत आहेत. शासनाच्या योजनांमधून युवकांना सबळ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून त्यानुसार बँकांना कर्ज वितरणाचे ठराविक उद्दिष्टही दिले जाते.

मात्र, प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच दिसते. बँका विविध कारणे पुढे करून कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात विलंब करीत असल्याने अर्जदार युवक निराश होत आहेत. आपले भविष्य घडविण्यासाठी सरकारी योजनांवर विश्वास ठेवून प्रयत्न करणाऱ्या या युवकांना प्रत्यक्षात कर्जाची मदत न मिळाल्याने त्यांच्या स्वप्नांना धक्का बसत आहे.

शासनाने उद्दिष्ट ठरवूनही कर्जवाटप प्रक्रियेत होत असलेली ही दिरंगाई ही योजनांच्या उद्देशालाच हरताळ फासणारी ठरत आहे. “योजना कागदावर आहेत पण बँकांच्या टेबलवर थांबून राहिलेल्या प्रस्तावांमुळे आमचे भविष्य अंधारात जात आहे,” अशा भावना अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

युवकांना स्वावलंबनाचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी शासनाने कडक पावले उचलून बँकांना जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक पातळीवर जोर धरत आहे. अन्यथा, बेरोजगारीवर मात करण्यासाठी असलेली ही महत्वाकांक्षी योजना केवळ कागदोपत्री राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.



