♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पेनटाकळीच्या पाण्याचे नियोजन जाहीर करा; शेतकऱ्यांवरील दडपशाही खपवून घेणार नाही! प्रकाश महाराज जवंजाळ यांचा प्रशासनाला इशारा; वीजजोडण्या पूर्ववत करण्यासाठी पेन सावंगीत धरणग्रस्तांचे आमरण उपोषण

 

MH 28 News Live / चिखली : पेनटाकळी प्रकल्पातील पाणीवाटप आणि उपसा सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या खंडित करण्याच्या आदेशावरून चिखली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र झाला आहे. उभ्या पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित करण्याच्या निर्णयाविरोधात पेन सावंगी येथे पैनगंगा नदीकाठावर धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला विविध शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. उपोषणस्थळी उपस्थित महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ यांनी, “पेनटाकळीच्या पाण्याचे नियोजन आधी जाहीर करा, शेतकऱ्यांवरील दडपशाही सहन करणार नाही,” असा इशारा प्रशासनाला दिला.

पाणीवाटपाचा लेखी हिशेब द्या !

उपोषणस्थळी प्रकाश बुवा जवंजाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती चिखलीचे सभापती समाधान सुपेकर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, शेतकरी संघटनेचे देविदास कणखर आणि समाधान कणखर यांनी प्रशासनाच्या पाणीवाटप धोरणावर प्रश्न उपस्थित केले. पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध नसून किती पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार, किती पाणी खालच्या भागात सोडणार आणि धरणग्रस्त शेतकऱ्यांना किती पाणी मिळणार, याचे स्पष्ट नियोजन जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. यापूर्वी दोन वेळा पाणी सोडण्यात आले असून, पहिल्यांदा पाणी सोडण्याची आवश्यकता नसतानाही पाणी सोडण्यात आल्याचा आरोप वक्त्यांनी केला. आता पुन्हा पाणी सोडण्याबाबत दबाव निर्माण होत असताना उपलब्ध पाण्याचा हिशेब शेतकऱ्यांना का दिला जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

धरणग्रस्तांच्या त्यागाचा विसर पडला का ?

पेनटाकळी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी अल्प मोबदल्यात जमिनी दिल्या. एकरी ४० हजार रुपये मोबदला मिळालेल्या जमिनींचे आजचे मूल्य एकरी ४० लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे उदाहरण देत वक्त्यांनी धरणग्रस्तांच्या त्यागाकडे लक्ष वेधले. धरणासाठी जमीन देऊनही उर्वरित शेतीतील पिकांना पाणी मिळत नसेल, तर या शेतकऱ्यांनी काय मिळवले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हळद, तूर आणि चारा पिकांवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला असून पाण्याअभावी ही पिके धोक्यात आली आहेत. लहान शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाद्वारे उभ्या पिकांना पाणी देण्याची परवानगी आणि वीजजोडण्या पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे

जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन निर्णय घ्यावा, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घालून पाणीवाटपाचा तिढा सोडवावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आमदार श्वेता महाले यांनी यापूर्वी मांडलेल्या भूमिकेचाही उल्लेख करण्यात आला. पाणी सोडण्यास विरोध नसून पाण्याचे नियोजन आधी स्पष्ट करावे, ही भूमिका प्रशासनानेही स्वीकारून चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन करण्यात आले. वरखेड, मंगरूळ नवघरे, घानमोड, मानमोड, डोंगरगाव, नायगाव खुर्द, नायगाव बुद्रुक, पेन सावंगी, भोरसा-भोरसी आणि पांढरदेव आदी गावांतील धरणग्रस्त शेतकरी या प्रश्नात सहभागी आहेत. गावनिहाय पाणीवाटपाचे लेखी नियोजन जाहीर करणे, वीजजोडण्या पूर्ववत करणे आणि उभ्या पिकांसाठी पाणी उपलब्ध करून देणे या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणीवाटपाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129