
तुम्ही आधार कार्डला ईमेल आयडी जोडलाय का ? नसेल तर ही आहे अंतिम मुदत; नंतर भरावा लागेल दंड… जाणून घ्या याबद्दल काय आहेत नियम
MH 28 News Live : आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी जोडायचा असेल किंवा जुना ई-मेल बदलायचा असेल, तर नागरिकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ही प्रक्रिया मोफत करता येणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नव्या ‘Aadhaar App’ द्वारे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या निर्धारित मुदतीनंतर ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी ७५ रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे अद्याप आधारशी ई-मेल आयडी लिंक न केलेल्या किंवा जुना ई-मेल बदलू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.

आधार कार्ड हे आजच्या काळात विविध शासकीय योजना, आर्थिक व्यवहार आणि अनेक महत्त्वाच्या सेवांसाठी आवश्यक ओळखपत्र बनले आहे. त्यामुळे आधारमधील वैयक्तिक माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी नागरिकांना आधार सेवा केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. स्मार्टफोनमधील अधिकृत Aadhaar App च्या माध्यमातून घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
ई-मेल अपडेटसाठी या गोष्टी आवश्यक
आधारमधील ई-मेल आयडी जोडण्यासाठी किंवा बदलण्यासाठी नागरिकांकडे UIDAI चे अधिकृत Aadhaar App, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि नवीन ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. याशिवाय, ओळख पडताळणीसाठी ॲपमध्ये फेस ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
अशी पूर्ण करा ई-मेल अपडेटची प्रक्रिया
सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये Aadhaar App डाउनलोड करून आधार क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करावे. आधारशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी प्रविष्ट करून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ॲपमधील ‘Services’ विभागात जाऊन ‘Email Add/Update’ हा पर्याय निवडावा. येथे नवीन ई-मेल आयडी प्रविष्ट केल्यानंतर संबंधित ई-मेलवर आलेला ओटीपी ॲपमध्ये टाकून पडताळणी करावी. पुढील टप्प्यात मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याद्वारे फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करून स्क्रीनवरील सूचनांनुसार अपडेटची विनंती सबमिट करावी.
लग्न किंवा घटस्फोटानंतर नाव बदलताना विशेष नियम
दरम्यान, लग्न किंवा घटस्फोटानंतर नाव अथवा आडनावात बदल करू इच्छिणाऱ्या महिलांसाठीही आधार अपडेटसंदर्भात विशिष्ट तरतुदी आहेत. अशा प्रकरणांमध्ये ओळखपत्राच्या पुराव्यासोबत ‘Annexure D’ हे शपथपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित नावातील बदल विवाह किंवा घटस्फोटामुळे झाला असून व्यक्तीची मूळ ओळख कायम असल्याचे या शपथपत्रात स्पष्ट करावे लागते. तसेच, लिंगबदलानंतर नाव अपडेट करण्यासाठीही निर्धारित मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) तरतुदी असून वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
आधारमधील संपर्क माहिती अद्ययावत राहावी आणि महत्त्वाच्या सूचना नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचाव्यात, हा या सुविधेमागील उद्देश आहे. त्यामुळे ई-मेल आयडी अपडेट करण्याची आवश्यकता असलेल्या नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२६ पूर्वी उपलब्ध मोफत सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



