
तापकीरी रंगाच्या थैलीत त्याने लपवला होता एक किलो गांजा आणि पोलिसांनी घातला घरावर छापा मग पुढे काय झालं….?
MH 28 News Live / देऊळगाव राजा : पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत महत्त्वाची कारवाई करत सिनगाव जहांगीर येथे आज (ता. १६) घरझडतीदरम्यान १ किलो ६८ ग्रॅम गांजा जप्त केला. सदर कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहीम अंतर्गत केलेल्या या कारवाई बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १६ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १.१५ ते २.३० वाजेदरम्यान आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला.दरम्यान राजपत्रित अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, शासकीय पंच, फोटोग्राफर व वजनकाटा धारक यांच्या उपस्थितीत घरझडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान आरोपीच्या घरातील तपकिरी रंगाच्या पिशवीमध्ये १ किलो ६८ ग्रॅम गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी हा सदर अंमली पदार्थ जवळ बाळगून त्याची विक्री करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्या फिर्यादीवरून रमेश येडूबा सानप वय ६५ राहणार सिनगांव जहागीर याच्या विरुद्ध एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कुवारे करीत आहेत.
या कारवाईवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक आशीष इंगळे, सपोनि सविता कुवारे तसेच पोउपनि नितीन मिंड यांच्यासह महसूल व पोलीस पथक उपस्थित होते.



