
प्रेमाचा त्रिकोण रक्तरंजित! प्रेयसीनेच नवऱ्याच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला; छाती, पोट आणि गळ्यावर चाकूचे सपासप वार! चिखली तालुक्यातील कव्हळा-महिमळ रस्त्यावर थरारक हत्याकांड; खुनानंतर प्रेयसीनेच मृताच्या चुलत भावाला दिली माहिती; दोन्ही आरोपी पोलिसांच्या अटकेत
MH 28 News Live / अमडापूर : प्रेमासाठी पहिल्या नवऱ्याला सोडले, प्रियकरासोबत वर्षभर संसार थाटला आणि त्यानंतर पुन्हा त्याच पहिल्या नवऱ्याशी प्रेमसंबंध जुळले. या प्रेमाच्या विचित्र त्रिकोणाचा शेवट एका तरुणाच्या निर्घृण हत्येने झाल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील कव्हळा ते महिमळदरम्यानच्या कच्च्या रस्त्यावर १५ नोव्हेंबर रोजी घडली. गोपाल ऊर्फ संजय मंजुळ पवार (रा. टाकरखेड हेलगा, ता. चिखली) असे मृत तरुणाचे नाव असून, कोमल भोसले (रा. वर्दडा) आणि अजय ऊर्फ गोट्या विजय पवार या दोघांना आमडापूर पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमासाठी जिच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्ने गोपालने पाहिली, त्याच प्रेयसीने पतीच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या हत्याकांडाची पार्श्वभूमी एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही मागे टाकणारी आहे. कोमल भोसले आणि अजय ऊर्फ गोट्या विजय पवार हे पूर्वी पती-पत्नी होते. मात्र, विवाहित असतानाच कोमलचे गोपालसोबत प्रेमसंबंध जुळले. या संबंधातून तिने अजयला सोडले आणि गोपालसोबत राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापासून दोघेही पती – पत्नीसारखे एकत्र राहत होते. मात्र, काही काळानंतर कोमलच्या आयुष्यात पुन्हा पहिल्या नवऱ्याची एंट्री झाली. अजय आणि कोमल यांच्यात पुन्हा प्रेमसंबंध निर्माण झाल्याने गोपाल, कोमल आणि अजय असा प्रेमाचा गुंतागुंतीचा त्रिकोण तयार झाला. याच संबंधातून गोपालला संपविण्याचा कट आखण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी गोपाल आणि कोमल हे दोघे मोटारसायकलने पांढरदेवकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, या प्रवासातच गोपालच्या हत्येचा कट अंमलात आणण्यात आल्याचा आरोप आहे. कोमलने वाटेत अजय ऊर्फ गोट्या विजय पवार याला बोलावून घेतले. कव्हळा ते महिमळ या निर्जन कच्च्या रस्त्यावर दोघांनी मिळून गोपालवर चाकूने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. छाती, पोट, गळा आणि शरीराच्या इतर भागांवर चाकूचे सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोपालचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित हत्याकांडाने परिसर हादरून गेला.
या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, गोपालची हत्या झाल्यानंतर कोमलने स्वतःच त्याचा चुलत भाऊ मनोज आसाराम पवार याला फोन करून गोपाल महिमळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच मनोज आणि त्याचा चुलत भाऊ करण आसाराम पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तेथे गोपाल रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला आढळला. दरम्यान, आरोपी कोमल आणि अजय घटनास्थळावरून पसार झाले होते. मनोज पवार यांनी आमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासाअंती दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. प्रेमसंबंध, विश्वासघात आणि निर्घृण हत्येच्या या प्रकरणाचा पुढील तपास आमडापूर पोलीस करीत आहेत.



