
जळगाव जामोद येथे शुक्रवारी रोजगार मेळावा. उमेदवारांना एक हजार जागांवर नोकरीची संधी
MH 28 News Live, बुलडाणा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जळगाव जामोद येथे शुक्रवार, दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. हा मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव जामोद येथे घेण्यात येईल. या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये 16 पेक्षा अधिक उद्योजकांनी 1 हजारपेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात इंडोरामा, महिंद्रा, हिताची यासारख्या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करतील. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एल ॲण्ड टी, रेमंड, इंड्युरंस सारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांनी जळगाव जामोद येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.
पात्र, गरजू आणि नोकरी इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करु शकतील. मुलाखतस्थळी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहून नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपनींच्या प्रतिनिधीसमवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. याबाबत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे कळविले आहे.