
माहिती दडवणाऱ्या तलाठ्याला दिली माहिती आयोगाने नोटीस; महेंद्र मोदे यांच्या अपिलावर माहिती आयोगाची कारवाई
MH 28 News Live / चिखली : राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठात माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या द्वितीय अपीलाची सुनावणी १७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. चिखली येथील रहिवासी महेंद्र बसवेश्वर मोदे यांनी माहिती न मिळाल्यामुळे हे द्वितीय अपील दाखल केले असून, याची सुनावणी आयोगाच्या अमरावती खंडपीठात होणार आहे.
या प्रकरणात जन माहिती अधिकारी – तलाठी कार्यालय शेलूद/सोमठाणा/दिवठाणा (साझा क्र. २९), तसेच प्रथम अपिलीय प्राधिकारी – निवासी नायब तहसीलदार, चिखली यांना आयोगाने सुनावणीस प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीसाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि अभिलेखांसह हजर राहणे बंधनकारक आहे. कोणताही प्रतिनिधी पाठविण्यास परवानगी दिलेली नाही.
आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती पुरवण्यासंबंधी कार्यवाहीचा अहवाल, पत्रव्यवहाराचे पुरावे, तसेच अर्जदाराच्या स्वाक्षरीसह कागदपत्रे सादर करावी. सुनावणीपूर्वी किमान पाच दिवस आधी आयोगाच्या कार्यालयात हा अहवाल पोहोचावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
प्रकरणाची सुनावणी ही अंतिम असून त्यानंतर पुढील तारीख दिली जाणार नाही. त्यामुळे अपिलकर्ता व अधिकाऱ्यांनी सुनावणीस उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच संबंधित अधिकारी कार्यरत कालावधीतील माहिती आणि सध्याचे पदनाम व कार्यालयीन पत्ता याची प्रमाणित यादीही सादर करावी लागणार आहे. हा निर्णय माहिती अधिकाराच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी प्रशासनाची जबाबदारी स्पष्ट करण्याचा प्रयत्न आयोग करत आहे.