
‘ देवाभाऊ लाडकी बहीण ‘ पतसंस्थेचे ना. बावनकुळे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ. श्वेता महाले यांचे आवाहन
‘MH 28 News Live / चिखली : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील स्त्रियांना सन्मानाने त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी आणि आर्थिक सक्षमता व स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने फक्त लाडक्या बहिणींसाठी असलेली लाडकी बहीण पतसंस्था राज्यभरात स्थापन करण्याचा निर्णय घेऊन स्त्री सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. तरी महाराष्ट्रात सर्वप्रथम चिखली मध्ये स्थापन होत असलेल्या लाडकी बहीण पतसंस्थेच्या उद्घाटनाला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी केले आहे.

या पतसंस्थेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या त्याचप्रमाणे गावागावातील बचत गटाच्या माध्यमातून एकमेकांशी जुळलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा मोठा प्रकल्प असणार असून, महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी बचत तसेच स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात येणारी सहकारी पतसंस्था आहे. याचा लाभ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी घ्यावा असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी व नियोजित देवा भाऊ लाडकी बहीण नागरी सहकारी पतसंस्था चिखली जिल्हा बुलढाणा या पतसंस्थेच्या अध्यक्षा व संचालक मंडळाने केले आहे.

रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर स्थापन होत असलेल्या या पतसंस्थेचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव असणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मंत्री भारत बोंद्रे, आमदार चैनसुख संचेती,आमदार संजय कुटे, आमदार संजय गायकवाड,आमदार मनोज कायंदे, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आ. शशिकांत खेडेकर तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे राहणार असून या सर्व आयोजनाची व स्वागताची सर्व तयारी देवा भाऊ लाडकी बहीण पतसंस्थेच्या अध्यक्षा व संचालक मंडळ चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनात करत आहेत.
तरी या नियोजित पतसंस्थेच्या उद्घाटनाला ९ ऑगस्ट रोजी,शनिवारी सकाळी १० वाजता अंबिका कॉम्प्लेक्स, मेन रोड, चिखली येथे संपूर्ण जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी अतिशय उत्साहाने व मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले आहे.



