
जिल्ह्यात ५१ हजार महिलांचा लाभ थांबला; लाडकियो बहिनी योजनेच्या अटी झाल्या अधिक कठोर
MH 28 News Live / बुलडाणा : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घाईगडबडीत सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार टाकत असल्याची चर्चा सुरू आहे. परिणामी, लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी शासनाने कठोर अटी लागू केल्या आहेत.
राज्य शासनाच्या नव्या निर्देशांनुसार, एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून, लाभार्थीचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यामुळे ६५ वर्षांवरील महिला आणि एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचा लाभ थांबवण्यात येणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील आकडेवारीनुसार, अशा अटींमध्ये बसणाऱ्या तब्बल ५१ हजार ४३० महिलांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. यामध्ये ३९ हजार २६७ महिला एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या यादीत असून, १२ हजार १३३ महिला ६५ वर्षांवरील आहेत. या प्रकरणांची पडताळणी सुरू असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी दिली. सध्या बुलडाणा जिल्ह्यात एकूण ६ लाख ११ हजार महिलांना या योजनेचा लाभ मंजूर आहे. मात्र, नियमभंग करणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाला राज्य शासनाकडून स्पष्ट निर्देश दिले आहेत.
दरम्यान, योजनेत काही ठिकाणी पुरुषांनीही नोंदणी करून लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तथापि, बुलडाणा जिल्ह्यात असा एकही प्रकार नसल्याचे अमोल डिघुळे यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होत नसेल, अशा महिलांनी आपल्या तालुक्यातील महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.



