♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

माजी सैनिकाची नोकरी लावून देण्याची फसवणूक! ११ तरुणांना ३४ लाखांनी गंडवले; शेगावहून आरोपी अटक

MH 28 News Live / शेगाव : नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ११ बेरोजगार तरुणांची तब्बल ३४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस तपासात उघड झाल्यानंतर कुही पोलिसांनी या फसवणुकीचा सूत्रधार असलेल्या एका माजी सैनिकास बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव पुरुषोत्तम ज्ञानदेव बिलेवार (वय ४२, रा. सैनिक कॉलनी, शेगाव, जि. बुलढाणा) असे असून तो काही काळ भारतीय सैन्यात कार्यरत होता. सैन्यातील माजी सैनिक असल्याचा आणि सरकारी नोकरभरतीत ओळखी असल्याचा दावा करीत त्याने बेरोजगार तरुणांना नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. सोशल मीडियावर पोस्ट करून त्याने विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण केले आणि अनेकांना जाळ्यात ओढले.

कुही तालुक्यातील ११ तरुणांनी त्याच्या आमिषाला बळी पडत टप्प्याटप्प्याने त्याला ३४ लाख ६० हजार रुपये दिले. मात्र, बराच काळ उलटूनही नोकरी मिळाली नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत. अखेर एका तरुणाने धैर्य दाखवत कुही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सखोल तपास करत पुरुषोत्तम बिलेवार याच्यावर भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम ३१८ (२) व ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला शेगाव येथे पकडले.

दरम्यान, या प्रकरणात आरोपीने सोशल मीडियाचा वापर करून फसवणुकीचे जाळे उभे केले होते. यू-ट्यूब व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तो बेरोजगार तरुणांशी संपर्क साधत असे. पोलिसांना १५ सप्टेंबर रोजी याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या शेगाव येथील घराची झडती घेतली असता नोटा मोजण्याची मशीन सापडली. त्यामुळे त्याने यापूर्वीही अशाच पद्धतीने अनेकांना गंडवले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. कुही पोलिस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून आरोपीकडून अजून काही फसवणुकींचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129