
लोणार सरोवरात ‘जीवंत’ खळबळ! खाऱ्या पाण्यात माशांचा उदय, जैवविविधतेला धोका
MH 28 News Live / लोणार : जगविख्यात व दुर्मिळ जैवविविधतेसाठी ओळखले जाणारे लोणार सरोवर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. खाऱ्या पाण्यामुळे जिथे पूर्वी कोणत्याही प्रकारचे मासे टिकू शकत नव्हते, त्या सरोवरात आता मोठ्या प्रमाणावर माशांचे थवे दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे, केवळ महिनाभरापूर्वी सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी ‘सरोवरात मासे असूच शकत नाहीत’ असे स्पष्ट विधान केले होते. मात्र, आता सरोवराच्या पारदर्शक पाण्यात माशांचे प्रत्यक्ष अस्तित्व दिसत असल्याने प्रशासनाचे विधान संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

नागरिकांचा प्रत्यक्षदर्शी दावा
दर मंगळवारी कमळजा मातेच्या दर्शनासाठी सरोवर परिसरात येणाऱ्या स्थानिक नागरिकांनी पाण्यात विविध आकारांचे मासे स्पष्टपणे दिसल्याचा दावा केला आहे. काहींनी तर या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे टिपली आहेत. “आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी सरोवरात मासे पाहिले,” असा ठाम दावा प्रत्यक्षदर्शींनी केला असून प्रशासनाच्या ‘मासेविरहित सरोवर’ या दाव्याला आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अतिवृष्टीने गोडे पाणी मिसळल्याचा तज्ज्ञांचा अंदाज
लोणार सरोवराच्या खारट पाण्यात कोणताही सजीव दीर्घकाळ टिकू शकत नाही, अशी पारंपरिक समजूत होती. मात्र, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यांद्वारे गोडे पाणी आणि सांडपाणी सरोवरात मिसळल्याने पाण्याच्या क्षारतेत घट झाली. त्यामुळे काही माशांच्या प्रजातींसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ‘लोकमत’ने याच संदर्भात २२ सप्टेंबर रोजीच ‘सरोवरात तिलापिया माशांचा प्रवेश’ झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

नमुने तपासणीसाठी अमरावतीला
सरोवराच्या आत, विशेषतः कमळजा मातेच्या मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात हे मासे आढळले असून त्यांच्या प्रजातींची ओळख पटवण्यासाठी नमुने तपासणीसाठी अमरावती येथे पाठवण्यात आले आहेत. वनविभागाकडून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती उपाययोजना सुरू करण्यात आली आहे.
“माशांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे,”
असे चेतन राठोड, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव), अकोला यांनी सांगितले.
लोणार सरोवरातील या नव्या ‘जीवंत’ हालचालीमुळे स्थानिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असली तरी या जैवविविधतेच्या अद्वितीय वारशावर धोका निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.



