
कर्जाच्या ताणातून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; भरोसा गावात हळहळ
MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील भरोसा गावात २४ वर्षीय तरुण शेतकरी सागर कचरूबा जोहारे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परवा “शेतात पाणी देऊन येतो” असे सांगून सागर घरातून निघाले होते; मात्र ते परत न आल्याने कुटुंबीयांनी दोन दिवस सर्वत्र शोध घेतला. तरीही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर काल सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खडकपर्णा धरणातून येणाऱ्या जय सेवालाल पाटातील जाळीत त्यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.
शेतात जाणाऱ्या स्थानिकांना हा प्रकार दिसताच त्यांनी तत्काळ अंधेरा पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे भरोसा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सिद्धार्थ सोनकांबळे पुढील तपास करत आहेत.



