
मृग कोरडाच! बुलढाण्यात पावसाची प्रतिक्षा, जलसंकट अधिक गहिरे
MH 28 News Live / बुलढाणा : राज्यातील काही जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला असला, तरी बुलढाणा जिल्हा अद्याप समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. मृग नक्षत्र सुरू होऊनही जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. वातावरणात सातत्याने बदल होत असले, ढग दाटून येत असले तरी प्रत्यक्ष पाऊस मात्र पडत नसल्याने जिल्ह्यात निराशेचे सावट पसरले आहे.

डिझेल टंचाई आणि वाढत्या खर्चाचा सामना करत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत आणि पेरणीपूर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात सुमारे ७.४० लाख हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी सज्ज करण्यात आले आहे. मात्र वरुणराजाने अद्याप पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या आशा अधांतरी राहिल्या आहेत. वेळेवर पाऊस न झाल्यास खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टँकरवर ९१ हजार ग्रामस्थांची तहान
पावसाअभावी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सध्या तब्बल ९१ हजार ग्रामस्थांची तहान टँकरच्या माध्यमातून भागविली जात आहे. जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, १२१ गावांना १३८ अधिग्रहित खासगी विहिरींच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र आगामी काही दिवसांतही पावसाने दडी मारली, तर परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोठ्या धरणांतील जलसाठा धोक्याच्या पातळीवर
यंदाच्या विक्रमी तापमानामुळे आणि वाढलेल्या बाष्पीभवनामुळे जिल्ह्यातील ५१ लहान-मोठ्या धरणांतील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. अनेक प्रकल्प तळ गाठण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पात केवळ ५१.६९५४ दशलक्ष घनमीटर इतकाच मृतसाठा उरला आहे. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पात ३७.५४ टक्के, तर मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पात ४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या तीन प्रमुख प्रकल्पांतील सरासरी जलसाठा केवळ २२.५९ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.

लघु प्रकल्प कोरडे; काही धरणांमुळेच दिलासा
जिल्ह्यातील सात मध्यम आणि ४१ लघु प्रकल्पांची स्थितीही अत्यंत चिंताजनक बनली आहे. मोताळा तालुक्यातील पलढग प्रकल्पात केवळ २.९३ टक्के, खामगाव तालुक्यातील तोरणा प्रकल्पात १४.३२ टक्के, उतावळी प्रकल्पात २२.०८ टक्के, मन प्रकल्पात २४.९५ टक्के आणि मस प्रकल्पात ३०.९८ टक्के जलसाठा उरला आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील तीव्र होत चाललेल्या जलसंकटाची गंभीरता अधोरेखित करणारी आहे.
दरम्यान, ज्ञानगंगा प्रकल्पात ४५.४५ टक्के आणि कोराडी प्रकल्पात ४३.२५ टक्के जलसाठा असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी ४१ लघु प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. या सर्व लघु प्रकल्पांमध्ये मिळून केवळ १७.७५ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने बुलढाणा जिल्ह्यावर मोठ्या जलसंकटाचे सावट अधिक गडद होत आहे.



