
अनुदानित सोयाबीन बियाणे वाटपाचा लक्ष्यांक वाढवा; आमदार श्वेता महाले यांची विधानसभेत मागणी
MH 28 News Live / चिखली : स्थानिक आमदार श्वेता महाले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे अनुदानित सोयाबीन बियाणे वाटपातील गोंधळ आणि शेतकऱ्यांवरील अन्यायाचा प्रश्न उपस्थित केला. यंदा कृषी विभागाकडून सोयाबीन बियाणे वाटपाचा लक्ष्यांक मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्याने हजारो शेतकरी योजनेपासून वंचित राहिल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

चिखली तालुक्यात ८,१६६ शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र केवळ ९०६ शेतकऱ्यांनाच बियाणे मिळाले असून ७,२६० शेतकरी वंचित राहिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बुलढाणा तालुक्यात ४८,३९३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना फक्त ४,८२२ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून ४३,५७१ शेतकरी वंचित राहिले आहेत.
२५ किलोच्या पिशव्यांमधील वितरणामुळे मंजूर प्रमाण आणि प्रत्यक्ष वाटपात विसंगती निर्माण झाल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला. शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून अनुदानित सोयाबीन बियाणे वाटपाचा लक्ष्यांक तातडीने वाढवून सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार महाले यांनी केली.



