
क्रांतीज्योती योजनेत लाचखोरी; संरक्षण अधिकाऱ्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात
MH 28 News Live / जळगाव जामोद : क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकाऱ्यासह एका कंत्राटी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. जळगाव जामोद येथे तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ कार्यालयासमोर रचलेल्या सापळ्यात १२ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणातील आरोपी संरक्षण अधिकारी तुषार रमेश राणे हे मलकापूर येथे कार्यरत असून त्यांच्याकडे संग्रामपूर तालुक्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदाराच्या दिव्यांग भाचीला कांतीज्योती बालसंगोपन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या आर्थिक मदतीचा लाभ तसेच भविष्यातील लाभ सुरू ठेवण्यासाठी त्यांनी २४ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने जळगाव जामोद येथे सापळा रचला. यावेळी १२ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना संरक्षण अधिकारी तुषार राणे यांना रंगेहात पकडण्यात आले. या व्यवहारात बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचारी जगन्नाथ तुकाराम भिवटे याने सहकार्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अमरावती येथील एसीबीचे पोलीस अधीक्षक बापू बांगर व बुलढाणाचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार यांच्या पथकाने केली. कारवाईत विलास गुसांगे, प्रवीण बैरागी, अमोल झिने, प्रफुल्ल आमले, दीपक जाधव, जगदीश पवार, लक्ष्मीकांत इंगळे, श्याम भांगे, गजानन गाल्डे, रंजित व्यवहारे, नितीन शेटे आणि अनिता वारंगने यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे शासकीय योजनांच्या लाभासाठी लाच मागणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर एसीबीने पुन्हा एकदा प्रभावी कारवाई केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.



