♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मध्यप्रदेश सीमेवर एफडीएचा मध्यरात्री धडक छापा ! २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; चालक फरार, ‘मुख्य सूत्रधारावर मोक्का’ची मागणी

MH 28 Mn ews Live / जळगाव जामोद : बुलढाणा – मध्यप्रदेश सीमेवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मध्यरात्री टाकलेल्या धडक छाप्यात तब्बल २२ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा प्रतिबंधित सुगंधी गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईने गुटखा माफियांचे धाबे दणाणले असले, तरी कारवाईदरम्यान वाहन चालक पोलिसांना चकवा देत फरार झाल्याने या कारवाईला गालबोट लागले आहे.

विश्वसनीय माहितीच्या आधारे १० जुलै रोजी मध्यरात्री अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएच्या पथकाने निमखेडी वन विभाग तपासणी नाक्यावर नाकाबंदी केली. तपासणीदरम्यान संशयित टाटा इंट्रा गोल्ड वाहन थांबवून झडती घेतली असता शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. मात्र, कारवाई सुरू असतानाच चालकाने संधी साधून घटनास्थळावरून पलायन केले. या कारवाईत १० लाख ३९ हजार ५०० रुपयांचा पानमसाला (११,५५० पाकिटे), ६ लाख ९३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा (११,५०० पाकिटे), ५ लाख रुपयांचे टाटा इंट्रा गोल्ड वाहन आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण २२ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात फरार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता-२०२३ च्या कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करत आहेत.

मुख्य सूत्रधारावर मोक्का लाव

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केली आहे. त्यांनी यापूर्वीच १ जुलै रोजी अवैध गुटखा वाहतुकीबाबत तक्रार दिल्याचे सांगत, “हा केवळ एक ट्रक नसून संपूर्ण अवैध गुटखा रॅकेट आहे. फरार चालकासह मुख्य आरोपीला तातडीने अटक करून मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी. तसेच तालुक्यातील इतर अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी,” अशी मागणी केली.

गुटखा माफियांमध्ये खळबळ

एफडीएच्या या धडक कारवाईनंतर बुलढाणासह सीमावर्ती भागातील गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. फरार चालक आणि या अवैध रॅकेटचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती कधी लागणार, तसेच या प्रकरणातून आणखी कोणती मोठी नावे समोर येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129