
दहशतीचा अंत ! गिरडा परिसराला वेठीस धरणारा बिबट्या अखेर जेरबंद. ११ बकऱ्या, एका वासराचा बळी; अखेर बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास…
MH 28 News Live / बुलढाणा : गिरडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून हिंस्र बिबट्याच्या वावरामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचा अखेर अंत झाला असून, सलग दोन वेळा पाळीव जनावरांवर हल्ले करून मोठे नुकसान करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने यशस्वीपणे जेरबंद केले आहे. वनविभागाने रणनीतीपूर्वक उभारलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकल्याने अनेक दिवस भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गिरडा येथील शेतकरी रमेश बबनराव सोनुने यांच्या गोठ्यात ५ जुलै रोजी बिबट्याने घुसून तब्बल सहा बकऱ्यांचा फडशा पाडला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर अवघ्या नऊ दिवसांनी, १४ जुलै रोजी त्याच बिबट्याने पुन्हा हल्ला करत पाच शेळ्या आणि एका वासराला ठार केले. या सलग हल्ल्यांमध्ये एकूण ११ बकऱ्या आणि एका वासराचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे धोकादायक झाले होते. अनेकांनी सकाळी व सायंकाळी घराबाहेर पडणे टाळले, तर लहान मुलांना एकटे बाहेर न पाठवण्याचा निर्णयही ग्रामस्थांनी घेतला होता. संपूर्ण गावावर भीतीचे सावट पसरले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी स्वतः गिरडा येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याचे आदेश दिले. वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरात सातत्याने गस्त घालत बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले.
वनविभागाने आखलेल्या नियोजनबद्ध मोहिमेला अखेर यश मिळाले आणि हिंस्र बिबट्या पिंजऱ्यात अडकला. ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत वनविभागाच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे कौतुक केले.
दरम्यान, वनविभागाने जंगलालगतच्या भागातील नागरिकांनी अद्यापही सतर्क राहावे, वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. पकडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून वन्यजीव संरक्षण नियमांनुसार त्याला योग्य अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहितीही वनविभागाकडून देण्यात आली.



