
चिखलीत रंगणार विदर्भातील नंबर वन दहीहंडीचा थरार! भाजयुमोच्या भव्य दहीहंडीला ‘टाईमपास’ची प्राजू केतकी माटेगावकर आणि अभिनेत्री इशिता दत्ता प्रमुख आकर्षण…
MH 28 News Live / चिखली : श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारी आणि गोविंदांच्या थरारक मानवी मनोऱ्यांनी दरवर्षी गाजणारी चिखलीची महायुती दहीहंडी यंदाही भव्य-दिव्य स्वरूपात रंगणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही दहीहंडी विदर्भातील सर्वात मोठी आणि नंबर वन दहीहंडी म्हणून ओळखली जाते. शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिखली येथे हा भव्य सोहळा होणार आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या स्वागताध्यक्षतेखाली होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्याला यंदा विशेष आकर्षण लाभले आहे. ‘टाईमपास’ चित्रपटातील लोकप्रिय प्राजू अर्थात अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री इशिता दत्ता या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे चिखलीच्या दहीहंडीचा उत्साह यंदा आणखी द्विगुणित होणार आहे.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटक केंद्रीय आयुष राज्यमंत्री तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाशजी फुंडकर राहणार आहेत. महायुतीतील विविध मान्यवरांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा कार्यकर्त्यांकडून या भव्य दहीहंडी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गोविंदांचे थरारक मानवी मनोरे, ढोल-ताशांचा निनाद, डीजेचा गजर आणि हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर जल्लोषाने दुमदुमणार आहे.
भगवान श्रीकृष्ण आणि गोप-गोपिकांच्या प्रेमळ नात्याची आठवण करून देणारा हा उत्सव प्रेम, आनंद, बंधुभाव आणि एकजुटीचा संदेश देणारा आहे. दहीहंडीचा मानवी मनोरा हा परस्पर विश्वास, सहकार्य आणि एकजुटीवर उभा राहतो. त्याचप्रमाणे चिखलीच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले आहे.
कृष्णाच्या मुरलीचा सूर, गोविंदांचा थरार, ढोल-ताशांचा गजर आणि केतकी माटेगावकर व इशिता दत्ता यांच्या उपस्थितीचा ग्लॅमर यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित चिखलीची महायुती दहीहंडी यंदा आणखी भव्य आणि अविस्मरणीय ठरणार आहे.
विदर्भातील नंबर वन दहीहंडीचा हा थरार आणि जल्लोष प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी चिखलीसह बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे…



