♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा करुण अंत; परिसरात हळहळ आई जागीच ठार, मुलानेही रुग्णालयात सोडला प्राण

MH 28 News Live / बुलढाणा : शहरानजीक बुलढाणा – धाड मार्गावर शिवसाई नगर परिसरात भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्येष्ठा गौरीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा परिसरातील कोलापूर येथील अंकुश रामदास जाधव (वय २७) हा आपल्या आई आनंदाबाई रामदास जाधव (वय ६५) यांना मोटारसायकल क्रमांक एमएच २१ बीबी २८४२ वरून घेऊन बुलढाण्याकडे येत होता. दरम्यान, बुलढाण्याकडून धाडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने शिवसाई नगरसमोर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की आनंदाबाई जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर अंकुश गंभीर जखमी झाला.

गंभीर अवस्थेतील अंकुशला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या उपचारांनंतरही त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्याचाही मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात एकाच कुटुंबातील आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि बुलढाणा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. भरधाव वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा निष्पाप जीवांना प्राण गमवावे लागल्याने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129