
मुंबईचा ‘प्लॅन’ फसला, आता दिल्लीचा दौरा! सोशल मीडियावर पेटले युध्द; राहुल बोंद्रेंच्या पुढच्या राजकीय खेळीची उत्सुकता
MH 28 News Live / चिखली : भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर पोहोचलेले काँग्रेसचे राहुल बोंद्रे आता थेट दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. ऐनवेळी राहुल गांधी यांच्याशी झालेल्या संवादानंतर भाजप प्रवेशाला ब्रेक लागला आणि चिखलीच्या राजकारणात अचानक मोठा ट्विस्ट आला. आता दोन दिवस दिल्लीमध्ये मुक्काम करून बोंद्रे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असून, या चर्चेनंतर त्यांची पुढील राजकीय वाटचाल आणि काँग्रेसमधील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत होणारा संभाव्य पक्षप्रवेश थांबल्यानंतर सुरू झालेला हा ‘दिल्ली अध्याय’ चिखलीच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
शेवटच्या क्षणी सगळेच गणित उलटले
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा सुरू होती. मुंबईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांची उपस्थिती अशा जवळपास सर्वच बाबींची तयारी झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, कार्यक्रमाच्या आदल्या रात्री राजकीय सूत्रे अचानक फिरली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्याशी बोंद्रे यांचा संवाद झाल्याचे समोर आले आणि काही तासांतच संपूर्ण राजकीय चित्र पालटले.
राजकीय ‘यू-टर्न’; भावनिक संवादाने सगळेच बदलले!
या संपूर्ण घडामोडीच्या केंद्रस्थानी राहुल गांधी यांचा बोंद्रे यांना झालेला फोन असल्याचे वृत्त आहे. या संवादानंतर बोंद्रे भावूक झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेत त्यांनी काँग्रेसमध्ये राहण्याची भूमिका घेतल्याचे समोर आले. कालपर्यंत भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना अचानक काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय झाल्याने चिखलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
मुंबईचा रस्ता सोडून दिल्लीची वाट धरली; ‘पुढची चाल’ ठरणार.
भाजप प्रवेशाला ब्रेक लागल्यानंतरही राहुल बोंद्रे शांत बसलेले नाहीत. काल रात्री ते दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. दोन दिवसांच्या मुक्कामात ते राहुल गांधी तसेच काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. स्वतःची पुढील राजकीय वाटचाल, चिखली मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि काँग्रेसची आगामी दिशा याबाबत या चर्चेतून काही ठोस भूमिका निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘भाजपमध्ये प्रवेश की काँग्रेसमध्ये नवी इनिंग ?’ या चर्चेचा पुढचा टप्पा आता दिल्लीमध्ये रंगणार आहे.
समर्थक आमनेसामने, सोशल मीडियावर तुफान रणकंदन
दरम्यान, राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशापासून ते राहुल गांधी यांच्या फोनपर्यंत आणि आता दिल्ली दौऱ्यापर्यंतच्या प्रत्येक घडामोडीचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. बोंद्रे समर्थक, काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप समर्थक यांच्यात पोस्ट, कमेंट्स आणि प्रतिक्रियांमधून जोरदार शाब्दिक चकमकी सुरू आहेत. एकीकडे बोंद्रे यांच्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्या संभाव्य पक्षांतरावरून भाजप समर्थकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे सोशल मीडिया अक्षरशः चिखलीच्या राजकीय संघर्षाचे नवे रणांगण बनला आहे.
आता खरी उत्सुकता एका प्रश्नाची आहे. दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राहुल बोंद्रे चिखलीत कोणती भूमिका घेऊन परतणार? भाजप प्रवेशाचा अध्याय संपला आहे की राजकारणात अजून एक नवा ट्विस्ट बाकी आहे, याचे उत्तर त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच स्पष्ट होणार आहे.



