
काजू-बदाम घ्या, पण आमच्या बांधावर या !” चिखलीत शेतकऱ्यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन; चिल्लर रक्कम व काजू-बदाम मुख्यमंत्र्यांना पाठवले
MH 28 News Live / चिखली : बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना शासनाचे लक्ष प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावरील परिस्थितीकडे वेधण्यासाठी शेतकरी संघटना व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली चिखली शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. “काजू-बदाम घ्या, पण आमच्या बांधावर या!” असा उपरोधिक संदेश देत आंदोलनकर्त्यांनी शहरातून फिरून नागरिक, व्यापारी, नेते व पदाधिकाऱ्यांकडून चिल्लर रक्कम तसेच काजू-बदाम जमा केले.
काही व्यापाऱ्यांनी काजू-बदाम देत आंदोलनाला प्रतिसाद दिला, तर काहींनी रोख रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. जमा झालेल्या रकमेतून काजू-बदाम खरेदी करण्यात आले. त्यानंतर ही चिल्लर रक्कम आणि काजू-बदाम तहसीलदार, चिखली यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले.
पावसाअभावी खरीप पिकांना फटका
शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच उसनवारी करून मोठ्या खर्चाने खरीप पिकांची पेरणी केली. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व मका यासह विविध पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिके वाळू लागल्याने उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे कर्जफेड, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आगामी रब्बी हंगामाची तयारी या तिहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
बैठकीतील आढाव्यापेक्षा बांधावरील वास्तव पाहा
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठका घेऊन काजू-बदाम खाण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहावी, असा उपरोधिक सवाल देविदास कणखर व विनायक सरनाईक यांनी उपस्थित केला. “बैठकांमधील कागदी आढावे नकोत; प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची अवस्था पाहा आणि त्यानुसार तातडीने मदत जाहीर करा,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
सरसकट नुकसानभरपाईसह कर्जमाफीची मागणी
तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, पर्जन्यमान व प्रत्यक्ष पीक परिस्थितीच्या आधारे सरसकट नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
पालकमंत्र्यांनी बांधावर यावे
पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांनी केवळ आढावा बैठका न घेता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. पावसाचा खंड, पिकांची सद्यस्थिती, शेतातील नुकसान आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट याची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
आंदोलनाची शहरात चर्चा; काजू-बदाम देत नागरिकांचा पाठिंबा
चिखलीतील ‘भीक मांगो’ आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा रंगली. “काजू – बदाम घ्या, पण आमच्या बांधावर या!” या संदेशाला प्रतिसाद देत अनेक नेते, पदाधिकारी, व्यापारी आणि नागरिकांनी काजू-बदाम तसेच वर्गणी देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हे होते उपस्थित
देविदास कणखर, विनायक सरनाईक, समाधान कणखर, नितीन राजपूत, प्रकाश आंभोरे, आत्माराम कूटे, राजू शेटे, मुरलीधर येवले, भिकनराव सोळंकी, गणेश थुट्टे, शेषराव शेळके, विनोद थुट्टे, विठ्ठल सोळंकी, अरुण नेमाने, गजानन कूटे, विठ्ठल शेळके, पप्पू लेंडे, सचिन तरमळे, समाधान भुसारी, भागवत थुट्टे, औचितराव वाघमारे, शरद थुट्टे, राजेश शेळके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



