
मंदिर पाण्यात, परवानगी कागदात; लोणारमध्ये संताप ! नगरपालिका आणि पुरातत्त्व विभागाला आंदोलनाचा इशारा !
MH 28 News Live / (राहुल सरदार) लोणार* सरोवराची वाढती पाणीपातळी माता कमळजा मंदिरासह परिसरातील अन्य मंदिरे व दर्ग्यांसाठी धोकादायक ठरत असताना पाणी कमी करण्यासाठी आवश्यक परवानगी दिली जात नसल्याचा आरोप नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण पाटील मापारी यांनी केला. पुरातत्व व वन्यजीव विभागाकडून केवळ वेळ मारून नेली जात असून नगरपरिषदेला पाणी बाहेर काढण्याची परवानगी अद्याप मिळालेली नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नगरपरिषदेला पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यानंतर पुरातत्व विभागाने सरोवर परिसरातील कामास परवानगी नाकारल्याचे मापारी यांनी सांगितले. विरज धारा तीर्थाच्या पाण्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, जुन्या एक इंची पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी वर आणण्याचे काम करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. नगरपरिषदेने केंद्र सरकारच्या परवानगीसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून अद्याप परवानगी मिळालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपनगराध्यक्ष आबेद खान पठाण यांनी वाढत्या पाण्यामुळे माता कमळजा मंदिरासह सरोवरातील इतर मंदिरे व दर्गा पाण्याखाली गेल्याचे सांगितले. अनेक महिन्यांपासून मंदिर पाण्यात असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत तातडीने कार्यवाही न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.
शिवसेना नगरसेवक संतोष मापारी यांनी पुरातत्व व संबंधित विभागांकडून जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोप केला. नवरात्रोत्सवापूर्वी मंदिर परिसरातील पाणी कमी करण्यासाठी परवानगी न मिळाल्यास भाविकांसह आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
नगरसेवक शाम राऊत यांनी भाविकांच्या स्नानासाठी पवित्र विरज धारा तीर्थ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. सरोवर विकास समितीसमोर चुकीची माहिती मांडून धारा बंद करण्यात आल्याचा आरोप करत भाविकांच्या भावनांचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष आबेद खान पठाण, गटनेते नितीन शिंदे, आरोग्य सभापती अब्दुल उबेद अब्दुल मुनाफ, बांधकाम सभापती अनिकेत मापारी, महिला व बालकल्याण सभापती संतोष मापारी, सभापती साहेबराव पवार यांच्यासह नगरसेवक संतोष मापारी, पंढरी चाटे, गुलाबराव सरदार, गजानन मापारी, शाम राऊत, शेख जमील, अक्षय इंगळे, शुभम देसाई, हाजी मसूद कुरेशी, रमजान परसुवाले, शुभम भगत आणि जावेद कुरेशी आदी उपस्थित होते.



