कृष्ण प्रकाश यांचे खरे रुप समाजासमोर आले पाहिजे – राष्ट्रवादीच्या या आमदाराने केले पत्रातून आरोप
MH 28 News Live : काही वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पद सांभाळणारे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
त्यांनी याबाबत नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना पत्र दिले आहे. चांगल्या वित्तीय संस्थांची दिवाणी तक्रार असताना अनेक गुन्हे दाखल करून कोट्यवधी रुपये उकळल्याचाही आरोप केला आहे. यापूर्वीच्या आयुक्तांचा खरा चेहरा समाजापुढे उघड झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आमदार बनसोडे यांनी या पत्रात कृष्ण प्रकाश यांच्या गैरकारभाराचा पाढा वाचला आहे. यापूर्वी शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला होता, खोट्या कारवाया, लॅंडमाफिया, मटका, जुगार यांना प्रोत्साहन मिळत होते, म्हणून आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक निवेदन देऊन होणारी हप्ते वसुली आणि वसुली रॅकेटची माहिती दिली होती. याची दखल घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी २० एप्रिल रोजी त्यांची मुंबईत विशेष पोलिस महानिरीक्षक, व्ही आयीपी सुरक्षा या पदावर बदली केली.त्यांच्याजागी अंकुश शिंदे पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले. कृष्ण प्रकाश यांनी सुरुवातीला अवैध धंदे बंद करून दहशत मोडीत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या कामाबद्दल मोठा प्रचार व प्रसिद्धी करून त्यांनी जनतेची ‘वाहवा’ मिळवली. आपण उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली तक्रार सार्थक झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. थोड्याच कालावधीत त्यांनी जनतेची मोठी सहानुभूती मिळवली. त्यामुळे आम्हालाही वाटले की आता शहरात बदल घडेल. मात्र, झाले उलटेच, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
आपण प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहणारे व काम करणारे अधिकारी असल्याने शहरातील नागरिकांना पोलिसांनी संरक्षण द्यावे. दहशत, गुंडागर्दी, अवैद्य धंदे याचा बंदोबस्त करावा, वाहतूक सुरक्षित असावी. खून, दरोडे, मारामारी असे प्रकार घडू नयेत व सामान्य जनतेमध्ये कोणी दहशत निर्माण करू नये, याबाबत आपण नक्कीच नियोजन करून योग्य कारवाई कराल, अशी आम्हा पिंपरी-चिंचवडकरांना खात्री आहेच, असे म्हणतानाच त्यांनी पोलिस प्रशासनाचा कारभार स्वच्छ व पारदर्शक होण्याची मागणीही केली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिल्याचे बोलले जात आहे. त्यांचे अर्जदार म्हणून नाव आहे. या व्हायरल झालेल्या पत्रात शेकडो कोटी गोळा केल्याचा आरोप आहे. परंतु, त्यांनी आपण पत्र लिहिले नसल्याचे स्पष्ट केले. या पत्रामुळे माझी आणि पोलिस खात्याची बदनामी झाली आहे. त्यामुळे हे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत कृष्ण प्रकाश यांच्याशी त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझे आणि आमदार बनसोडे यांचे बोलणे झाले आहे. त्यांनी पत्र दिले नाही. परंतु, दिले असल्यास मी त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करेल. त्यांच्या मुलाला मी अटक केली होती म्हणून त्यांनी हे चुकीचे आरोप केले आहेत. दरम्यान, याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमदार बनसोडे यांचे पत्र अद्याप (ता. ६) माझ्याकडे आलेले नाही.
पोलिस बळाचा गैरवापर
खोटे गुन्हे नोंदवणे, बिल्डरची व सामान्य जमीन मालकांची फसवणूक करून घेतलेल्या जमिनीवर पोलिस बळाचा वापर करून ताबा मिळवून देणे, त्याबदल्यात भागीदारी घेणे, फ्लॅट घेणे, खोटे गुन्हे दाखल करणे, असे अनेक कारनामे यापूर्वी झालेले आहेत. मोकळे भूखंड, बिल्डर यांच्यावर दहशत करून पार्टनरशिप व कमी किमतीमध्ये फ्लॅट खरेदी, असे गैरप्रकार झालेले आहेत. चांगल्या वित्तीय संस्थांचा दिवाणी दावा असताना अशा प्रकारे गुन्हे दाखल करून अनेक कोटी रुपये उकळले गेले आहेत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
मसाज सेंटरमध्ये सापडलेल्या मुलींच्या तक्रारी ?
मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसायात सापडलेल्या मुलींचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी माझ्यापर्यंत पोचल्या आहेत. या तक्रारीसह इतर अनेक तक्रारी शासनाकडे पोचल्या आहेत. एकूणच, यापूर्वीच्या आयुक्तांचा खरा चेहरा समाजापुढे उघड झाला पाहिजे. मात्र, पोलिसी दहशतीपायी नागरिक पुढे येण्यास तयार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, असे बनसोडे पत्रात म्हणतात.
मागासवर्गीय कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे
मागासवर्गीय कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, माहिती अधिकारी कार्यकर्ता यासह मागासवर्गीय अधिकाऱ्यांची गळचेपी करून त्यांच्यावर खोट्या कारवाया करणे, असे उद्योग यांनी केलेले आहेत. जे गुन्हे खरे आहेत त्याबद्दल कोणत्याही परिस्थितीत कारवाई झालीच पाहिजे, परंतु झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब मुलांवर खोटे गुन्हे दाखल करायचे व गुन्हेगार निर्माण होण्यासाठी कृत्रिम वातावरण निर्माण करायचे काम यापूर्वी झालेले आहे
प्रसिद्धी मिळविण्याचाही आरोप
पूर्वीच्या आयुक्तांचा कार्यकाळ हा अत्यंत संशयास्पद असून, केवळ प्रसिद्धी मिळवून दुसऱ्या अधिकाऱ्याने केलेली कामगिरी स्वतःच्या नावावर घेऊन स्वत:ची सवंग प्रसिद्धी मिळवून सामान्य जनतेमध्ये नावलौकिक मिळवायचा, असे गैरप्रकार झालेले आहेत.
बँकेच्या पदाधिकाऱ्यांकडून उकळले पैसे
माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नामांकित बँकांच्या पदाधिकाऱ्यांवर एकाच वेळी अनेक गुन्हे दाखल करून इतर पदाधिकाऱ्यांकडून मोठी रक्कम उकळली गेल्याचा आरोप आमदार अण्णा बनसोडे यांनी या पत्रात केला आहे. याचा उल्लेख पिंपरी कॅम्पातील सेवा विकास बँकेशी संबंधित असून, या प्रकरणात माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यावर १७ गुन्हे दाखल केले होते. तर, माजी अध्यक्ष विजयकुमार रामचंदानी यांच्याबाबतचा हा आरोप असल्याची चर्चा पिंपरीच्या वर्तुळात आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button