
चिखली अर्बन बँकेच्या वतीने महिला बचतगटांना १ कोटी ४४ लाख ८० हजार रुपयांचे कर्जवाटप
MH 28 News Live, चिखली : दि चिखली अर्बन को-ऑप बँक, शाखा- चिखली तर्फे बचतगटाच्या १७२ महिलांना १ कोटी ४४ लाख ८० हजार रुपयांचे कर्जवाटप बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले पाहिजे या हेतूने चिखली अर्बन बँक कार्य करत आहे असे प्रतिपादन दिवटे यांनी केले.
बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या संकल्पनेतून महिला बचत गट स्थापन करून त्यांना अल्पदरात कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बचतगटांना अवघ्या दहा हजार रुपयांपासून कर्जवाटपाची सुरुवात केली. त्यानुसार तब्बल ३५००० पेक्षा जास्त महिलांना बँकेने कर्ज वाटप करून आर्थिक सक्षम करण्याकडे मोठे पाऊल उचलले असल्याचे पुरुषोत्तम दिवटे यांनी आपल्या भाषणात सांगितले. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योग सुरू करावे असे आवाहन त्यांनी केले. यासाठी चिखली अर्बन बँक या बचत गटांना सर्वोतोपरी मार्गदर्शन करेल आणि महिलांनी सुरू केलेल्या उद्योगाला चालना देऊन महिलांना आर्थिक सक्षम करणार असल्याचा मानस दिवटे यांनी व्यक्त केला.
आज महिलांना अल्पदरात कर्ज देऊन आम्ही अधिक कर्ज पुरवठा करीत आहोत. महिलांना सावकाराच्या दारात जाण्याची गरजच पडू नये हा आमचा उद्देश असून महिलांनी घेतलेले कर्ज हे योग्य त्या कामासाठी वापरावे आणि कर्जाचा हप्ता वेळेत भटला पाहिजे. कर्जाचा हप्ता इतर कोणाजवळही न देता अधिकृत प्रतिनिधी किंवा बँकेत जमा करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य डॉ. आशुतोष गुप्ता, बँकेचे संचालक राजेंद्र शेटे, शैलेश बाहेती, आनंद जेठाणी, तज्ज्ञ संचालक राजेश व्यवहारे, बँकेचे सरव्यवस्थापक संजय भंगिरे, शाखाधिकारी सतीश जोशी, बचत गट प्रतिनिधी देविदास सुरुषे, ज्योती परिहार, पवन तेलंगरे व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button