
संग्रामपुरजवळ अपघात, दोन दुचाकींच्या धडकेत १ ठार, १ गंभीर
MH 28 News Live, शेगांव : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन १ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज, ४ एप्रिलला दुपारी बाराच्या सुमारास शेगाव- वरवट बकाल रोडवरील भोनगाव फाट्याजवळ घडली. नंदकिशोर प्रल्हाद शितोळे (५५, रा. पळशी झांसी, ता. संग्रामपूर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदकिशोर शितोळे यांची दुचाकी (क्र. एमएच २८ डब्ल्यू २३२१) आणि शेगाव तालुक्यातील मनसगाव येथील प्रमोद मनोहर कंकाळ (३६) यांची दुचाकी (क्र. एमएच २८ डब्ल्यू ९३९) यांची समोरासमोर धडक झाली. यात दोघे गंभीर जखमी झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या ऑटोने दोघांनाही तातडीने शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शितोळे यांना मृत घोषित केले. अपघातात गंभीर जखमी झालेले प्रमोद कंकाळ यांना अकोला येथे हलविण्यात आले. शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.



