
जीडीसीसी क्रिप्टो करंसी प्रकरणातील प्रमोटर किरण खरात अखेर पोलिसांना शरण; १० मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी
MH 28 News Live : मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या जालन्यातील क्रिप्टो करन्सी प्रकरणातील मुख्य संशयित प्रमोटर किरण खरात अखेर पोलिसांना शरण आला आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना किरण खरात शरण गेला आहे. तर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास 10 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जालन्यातील जीडीसीसी प्रकरणात प्रमोटर किरण खरात, एक महिला व अन्य एक आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तींची संख्या अधिक असल्याने तसेच गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेत तपास जिल्हा आर्थिक शाखेकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील चार संशयितांना यापूर्वीच अटक केली आहे. तर त्यांच्याकडून चार कोटी रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
मात्र मुख्य प्रमोटर किरण खरात मात्र फरार होता. जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, त्याने औरंगाबाद खंडपीठात धाव घेत अटकपूर्ण जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान खंडपीठाने या प्रकरणातील महिला असलेल्या संशयित आरोपीस मागील आठवड्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तर किरण खरात यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 6 मे रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत शरण जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार किरण खरात हा पोलिसांना शरण आला आहे.
अटकेमागील पार्श्वभूमी
जीडीसी या अभासी चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगून जीडीसी कंपनीचा प्रमोटर म्हणून वावरणाऱ्या किरण खरात यांच्या सांगण्यावरून जालना, बुलढाणा आदी जिल्ह्यातील हजारों लोकांनी पैसे गुंतवविले होते. हा जीडीसी कॉइन २५ डिसेंबर २०२२ रोजी खुल्या बाजारात येणार असल्याचे खरात याने गुंतवणूदारांना सांगितले होते. मात्र सांगितलेल्या दिवशी जीडीसी कॉइन लाँच झाला नाही. त्यामुळे जीडीसी कॉइनचे दर कोसळले. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांच्या आशेवर पाणी फेरले गेले. तर याप्रकरणी गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला होता. तर या प्रकरणात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जावयाचे नाव आल्याने, हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यात गंभीर स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात आले होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button