♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सावकाराच्या जाचाने घेतला जीव; शेतमजुराची आत्महत्या, चिठ्ठीत मलकापूरच्या पाच जणांची नावे

MH 28 News Live / मलकापूर : धरणगाव येथील शिवाजी सुपडा घुगरे (वय ४२) या शेतमजुराने अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सावकार अभिषेक कापसे याने पैसे मागून मारहाण केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे, मारहाणीवेळी मलकापूर शहरातील रामदास पाटील, मंगेश थोरात, सुनील नेरकर, सुनील ढोले आणि अमित सोनटक्के हे घटनास्थळी उपस्थित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवाजी घुगरे यांनी काही महिन्यांपूर्वी अभिषेक सुनील कापसे याच्याकडून सहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. या रकमेसह एकूण ४० हजार रुपये परतफेड केल्यानंतरही कापसे यांनी अजून १ लाख २० हजार रुपयांची मागणी करत सतत तगादा लावला.

३ जून रोजी रात्री कापसे याने घुगरे यांच्या घरी जाऊन त्यांना बाहेर बोलावले व मलकापूर शहरातील रामदास पाटील यांच्या घरासमोर बेदम मारहाण केली. मारहाणीला रामदास पाटील, मंगेश थोरात, सुनील नेरकर, सुनील ढोले आणि अमित सोनटक्के हे साक्षीदार होते.

या अपमानास्पद घटनेमुळे मानसिक तणावात गेलेल्या घुगरे यांनी ४ जून रोजी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र ६ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत संपूर्ण हकिगत मांडली आहे. “मी ४० हजार रुपये परतफेड केले. तरीही अभिषेक कापसे पुन्हा पैसे मागत होता. मारहाण करत धमकी दिली,” असे त्यात नमूद आहे.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट मलकापूर शहर पोलिस ठाण्यात नेऊन आरोपीस अटक न झाल्यास मृतदेह न उचलण्याचा इशारा दिला. अखेर पोलिसांनी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार अभिषेक कापसेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129