
ज्ञानगंगेतील ‘ धुरंधर ‘ चे एकटेपण संपणार, जोडीला वाघिणीची एन्ट्री; व्याघ्र संवर्धनाला मिळणार नवी दिशा
MH 28 News Live / बुलढाणा : ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात आणखी एका वाघिणीचे आगमन झाल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या वन्यजीव संवर्धनाच्या वाटचालीत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात पुनर्वसित नर वाघाला येथे सोडण्यात आले होते. आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या दोन वर्षीय वाघिणीमुळे ज्ञानगंगेत नैसर्गिक व्याघ्र प्रजननाची आशा अधिक बळावली आहे.
जिल्ह्यात अंबाबरवा आणि ज्ञानगंगा अशी दोन वन्यजीव अभयारण्ये असून अंबाबरवा हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत आहे. तर ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट्यांची संख्या लक्षणीय असली तरी यंदाच्या वर्षी वाघांच्या आगमनामुळे या अभयारण्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी ज्ञानगंगेत दाखल झालेला ‘पीकेटी-1 सीपी-I’ हा नर वाघ गेल्या सात महिन्यांपासून येथे स्थिरावला आहे. स्थानिकांनी त्याला प्रेमाने ‘धुरंधर’ असे नाव दिले असले तरी वन विभागाच्या नोंदीत त्याची अधिकृत ओळख वेगळीच आहे. या वाघाने परिसराशी उत्तम जुळवून घेतल्याने वन्यजीव अभ्यासक आणि पर्यटकांचा ओढा ज्ञानगंगेकडे वाढला आहे.
दरम्यान, रविवारी रात्री वन विभागाच्या विशेष पथकाने ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वर्षांची वाघीण सुरक्षितपणे ज्ञानगंगा अभयारण्यात आणून सोडली. ही वाघीण ताडोबातील मोहर्ली परिक्षेत्रातील प्रसिद्ध कॉलरधारी वाघिणीच्या तीन बछड्यांपैकी एक असल्याची माहिती वन विभागाने दिली. वन्यजीव तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दुपारी तिचे सुरक्षित पकडणे, त्यानंतर विशेष बंदोबस्तात बुलढाण्यातील २०५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या ज्ञानगंगा अभयारण्यात स्थलांतर आणि जंगलात मुक्त सोडण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली. पुनर्वसित नर वाघासोबत तिची जोडी जमवून ज्ञानगंगेत प्रजननक्षम व्याघ्र लोकसंख्या निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
वन विभागाच्या मते, नर वाघाने आधीच अभयारण्याच्या वातावरणाशी यशस्वी जुळवून घेतले आहे. आता वाघिणीच्या आगमनामुळे नैसर्गिक व्याघ्र प्रजननाला चालना मिळण्याबरोबरच जैवविविधतेचे संवर्धन, परिसंस्थेचे संतुलन आणि वन्यजीव पर्यटनाच्या विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी ही घटना वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.



