
बहिणीला मँसेज का केला ? यावरून बुलडाण्यात भावाने केला युवकाच्या घरात तांडव, धास्तावलेल्या युवकाची आत्महत्या, भावासह अन्य आरोपी जेरबंद
MH 28 News Live, बुलडाणा : बहिणीच्या मोबाईलवर मॅसेज केलेल्या आदित्य बळीराम येवले या युवकाच्या घरात घुसून मारहाण, तोडफोड आणि छेडखानी करणार्या गुंडांच्या भीतीने सदर युवकाने आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा येथे दि. २० एप्रिलला घडली. संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आत्महत्या केलेल्या आदित्य येवले याच्या आईने याबाबत दिलेल्या तक्रारीवरून दुपारी चौघांविरुद्ध गुन्हा आदित्यच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार काल, १९ एप्रिलच्या रात्री साडेआठच्या सुमारास रोहिणी जाधव तिचा भाऊ रोहित उर्फ रबल्या जाधव, विशाल जाधव, अनुज सुरडकर, राहुल सुरडकर असे आदित्यच्या घरात घुसले. त्यावेळी राहुल सुरडकरच्या हातात तलवार होती. तु माझ्या बहिणीला मॅसेज का केले असे विशाल जाधव आदित्यला म्हणाला, तेव्हा आदित्यने आधी तुमच्या बहिणीने मॅसेज केले असे सांगत मोबाईल दाखवू लागला. तेवढ्यात रोहिणीने आदित्यच्या हातातील मोबाईल हिसकला आणि ती मॅसेज पाहू लागली. त्यानंतर काही वेळाने आदित्य वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. त्याची आई, बहीण त्याला पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले तेव्हा आदित्यने खोलीची आतून कडी लावलेली होती. खिडकीतून पाहिल्यावर आदित्य गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.. घराचा दरवाजा तोडून त्याला खाली उतरवून तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार नाही – येवले कुटुंबाची भूमिका
या घटनेनंतर मृतक आदित्यच्या नातेवाईकांनी आज,२० एप्रिल रोजी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच आदित्यचे मित्र नातेवाईक सर्वांनी आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात व नंतर शहर पोलीस ठाण्यात गर्दी केली. जोपर्यंत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आदित्यच्या नातेवाईकांनी घेतली. अखेर दुपारी १२ च्या सुमारास आदित्यच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून रोहित उर्फ रबल्या जाधव, विशाल जाधव, अनुज सुरडकर, राहुल सुरडकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे ठाणेदारांनी सांगितले असले तरी गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याने आरोपींना पळून जाण्यासाठी मदत झाल्याचे बोलले जात आहे.



