
चुलत भावासोबतच्या संबंधांच्या संशयातून तरुणीची हत्या; वडील आणि भावालाच अटक
MH 28 News Live / जळगाव जामोद : तालुक्यातील राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत धड व मुंडके आढळून आलेल्या तरुणीच्या हत्येचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात मृत तरुणीचे वडील आणि सख्ख्या भावानेच तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, अनैतिक संबंधांच्या संशयातून हा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

२६ एप्रिल रोजी राजुरा शिवारात एका महिलेचे धड अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सलग बारा दिवस विविध तांत्रिक व गोपनीय तपास केल्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातील खकनार येथील कलमेकर बापलेकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मृत तरुणीचा विवाह १५ एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील खाऱ्या टेंभूर येथील युवकासोबत झाला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या पाचव्या दिवशी, २० एप्रिल रोजी ती माहेरी खडकी येथे आली होती. तिचे चुलत भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय कुटुंबीयांना होता. लग्नानंतरही ती संबंध तोडण्यास तयार नसल्याने संतप्त झालेल्या वडील आणि भावाने २३ एप्रिलच्या रात्री तिची हत्या केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह राजुरा शिवारात आणून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.



