
निर्मल वारी आदर्श दिंडी’ पुरस्काराने कुंभारझरीच्या वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठानाचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला सन्मान
MH 28 News Live / चिखली : कुंभारझरी येथील वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान आयोजित स्वग्राम ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास यंदाचा ‘निर्मल वारी आदर्श दिंडी’ पुरस्कार – २०२६ जाहीर झाला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समिती, पंढरपूर यांच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानाच्या सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात देवस्थान समितीचे अध्यक्ष हरिभक्त औसेकर महाराज, हरिभक्त प्रकाश महाराज जवंजाळ, हरिभक्त शिवाजी महाराज मोरे, हरिभक्त माधवीताई निगडे, हरिभक्त देशमुख महाराज व हरिभक्त नडगिरेताई यांची प्रमुख उपस्थिती होती. हा पुरस्कार पूजनीय हरिभक्त साळूबा यशवंत सोनुने (सोनुने गुरुजी), सौ. सुमनबाई सोनुने, दिंडीचे विणेकरी हरिभक्त दिनकर महाराज तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्त शालीकराम पाटील म्हस्के व सुनील वायाळ यांनी स्वीकारला.
राज्य शासनाचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त झालेले पूजनीय सोनुने गुरुजी यांनी सेवेत असतानाच आणि निवृत्तीनंतरही समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. संतविचार घराघरात पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठानची स्थापना केली. जाफराबाद, भोकरदन आणि बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे ३५ गावे या प्रतिष्ठानशी जोडलेली असून, स्वग्राम ते पंढरपूर तसेच श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी, आळंदी येथे संजीवन समाधी सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, भागवत धर्म प्रशिक्षण शिबिरे, रक्तदान, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती आणि विविध सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविले जातात.
या प्रतिष्ठानाच्या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध आयोजन, प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक व्यवस्था, स्वच्छतेवर विशेष भर आणि अखंड नामस्मरण. दिंडीतील सर्व वारकरी एकसमान वेशभूषेत, शिस्तीत चालत भजन-कीर्तन करतात. मुक्कामस्थळी आणि मार्गावर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. भोजनासाठी ताट, वाट्या व ग्लासांचा वापर करून प्लास्टिक कचऱ्याला पूर्णतः प्रतिबंध केला जातो. यामुळे पर्यावरण संवर्धनाचा आदर्श समाजासमोर उभा राहिला आहे.
‘निर्मल वारी आदर्श दिंडी’ पुरस्कारामुळे जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. या दिंडीचा आदर्श इतरांनीही घ्यावा आणि वारकरी संप्रदायाच्या सेवाकार्याला अधिक बळ मिळावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



