
आ. श्वेताताई महाले म्हणाल्या; एकही पात्र शेतकरी कर्पाजमाफीसून वंचित राहता कामा नये !
MH 28 News Live / चिखली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघातील पहिल्या यादीत ११ हजार ८११ शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र, आधार प्रमाणीकरण, जॉइंट अकाउंट, फार्मर आयडी यांसह विविध तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या प्रश्नांची गंभीर दखल घेत आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
१,७५१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने करा
आधार प्रमाणीकरण न झालेल्या १ हजार ७५१ शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले. संयुक्त खात्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, फार्मर आयडीचा अभाव, मृत कर्जदारांच्या वारसांचे केवायसी तसेच कर्जाची रक्कम व कर्जमाफीच्या आकडेवारीतील तफावत तातडीने दूर करण्याची मागणीही महाले यांनी केली. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांना होल्ड लावू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
तांत्रिक विलंबामुळे सिबिल स्कोअर खराब होऊ नये
शेतकऱ्याची कोणतीही चूक नसताना कर्जमाफी प्रक्रियेतील विलंबाचा परिणाम त्याच्या सिबिल स्कोअरवर होता कामा नये, असे आमदार महाले यांनी स्पष्ट केले. तसेच पीएम किसान सन्मान निधीतील मृत लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष लाभ पोहोचेल, याची खात्री करावी, असेही त्यांनी बजावले.



