
मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; राज्यातील विविध भागात वादळी पावसाचा इशारा
MH 28 News Live : राज्यात मान्सूनचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलं असून हवामान विभागाने जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टी ओलांडणारा कमी दाबाचा पट्टा हवामानात मोठा बदल घडवून आणत असून, आज कोकण, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास असण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील निवडक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या मराठवाड्याचे आकाश ढगाळ आहे.
गेल्या सहा तासांत दक्षिण कोकणच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा १८ किमी प्रतितास वेगाने पूर्वेकडे सरकला. २४ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा पट्टा सांगलीपासून ४० किमी वायव्येस, रत्नागिरीपासून १०० किमी पूर्वेस आणि साताऱ्यापासून १४० किमी पूर्व-नैऋत्येस केंद्रित होता. सद्यस्थितीत तो दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकावर सरकत असून, हळूहळू कमकुवत होऊन स्पष्ट कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
मान्सून केरळमध्ये दाखल
यंदा नैऋत्य मान्सून २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला असून २००९ नंतर ही सर्वात लवकर नोंद आहे. मागील वेळेस २३ मे रोजी (२००९) मान्सूनने केरळात प्रवेश केला होता. सध्या मान्सून कर्नाटक, गोवा आणि कोकण किनारपट्टीकडे सरकत आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी ?
येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत मान्सून अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता असून, आंध्र-कर्नाटक आणि कोकणच्या काही भागांत लवकरच मान्सूनचं आगमन होणार आहे.
ठळक मुद्दे:
२४ मे २०२५ रोजी केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल
कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची नोंद
कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागांत पावसाचा प्रभाव
कोकण व गोव्यात सरासरीच्या आसपासचे कमाल तापमान
हवामानातील या बदलांकडे नागरिकांनी लक्ष देत सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.